पेटीएम, कॅशफ्रीवर ईडीची छापेमारी; १७ कोटींची रक्कम केली जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2022 08:07 AM2022-09-04T08:07:54+5:302022-09-04T08:08:45+5:30
यासंदर्भात ईडीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, मोबाइल ॲपद्वारे कर्ज देणाऱ्या पेटीएम, कॅशफ्री, रेझरपे या कंपन्यांच्या तसेच कंपनीशी संबंधित अशा सहा ठिकाणी शुक्रवारी आणि शनिवारी ईडीने छापेमारी केली.
मुंबई : मोबाइल ॲपवरून लोकांना कर्ज देणे आणि त्याच्या वसुलीसाठी लोकांची पिळवणूक केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी पेटीएम, कॅशफ्री, रेझरपे या कंपन्यांच्या बंगळुरू येथील कार्यालयांवर छापेमारी केली. या छापेमारीदरम्यान या कंपन्यांच्या खात्यांतील १७ कोटी रुपयांची रक्कमही जप्त करण्यात आली.
यासंदर्भात ईडीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, मोबाइल ॲपद्वारे कर्ज देणाऱ्या पेटीएम, कॅशफ्री, रेझरपे या कंपन्यांच्या तसेच कंपनीशी संबंधित अशा सहा ठिकाणी शुक्रवारी आणि शनिवारी ईडीने छापेमारी केली. या कंपन्यांकडून ॲपद्वारे ग्राहकांना कर्ज दिले गेले होते. मात्र, त्याच्या वसुलीसाठी ग्राहकांना ब्लॅकमेलिंग करण्यात आले. मानसिक त्रास देण्यात आला, असा ठपका या कंपन्यांवर आहे. या कंपन्यांविरोधात बंगळुरूच्या सायबर पोलिसांकडे १८ एफआयआर दाखल आहेत. या एफआयआरच्या अनुषंगानेच या कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांचा तपास ईडीने सुरू केला आहे.
या कंपन्यांनी काही भारतीयांची ओळखपत्रे, तसेच संबंधित कागदपत्रांचा गैरवापर करत त्यांना कंपनीत संचालक असल्याचे दाखवल्याचाही आरोप आहे. मात्र, या कंपन्यांचे खरे मालक चिनी नागरिक असल्याचेही तपासात उघड झाले आहे.
या कंपन्यांनी कर्जाचा व्यवसाय करतानाही अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचे ईडीच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. याच अनुषंगाने या कंपन्यांच्या बँक खात्यात असलेली १७ कोटी रुपयांची रक्कम ईडीने जप्त केली आहे.
कर्ज देणाऱ्या ६०० कंपन्यांना नोटिसा
मोबाइल ॲपद्वारे कर्ज देत ग्राहकांना लुबाडणाऱ्या कंपन्यांवर ईडीने गेल्या दोन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली असून सुमारे ६०० कंपन्यांना आतापर्यंत नोटिसा जारी केल्या आहेत. यातील काही कंपन्यांच्या कारभारात गैरप्रकार झाल्याचे निष्पन्न झाल्यावर ईडीने या कंपन्यांच्या मालमत्ता देखील यापूर्वीच ताब्यात घेतल्या आहेत.