सलमान खुर्शीद यांच्या पत्नी लुईस यांच्याविरोधात ईडीची मोठी कारवाई, PMLA अंतर्गत 45.92 लाखांची मालमत्ता जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 07:14 PM2024-03-04T19:14:01+5:302024-03-04T19:18:41+5:30
Salman Khurshid's wife Louise : ईडीने पीएमएलए अंतर्गत काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांची पत्नी लुईस खुर्शीद आणि इतर आरोपींची 45.92 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या पत्नी लुईस खुर्शीद यांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. ईडीने पीएमएलए अंतर्गत काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांची पत्नी लुईस खुर्शीद आणि इतर आरोपींची 45.92 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या टीमने उत्तर प्रदेशातील फरुखाबादमधील 29.51 लाख रुपयांची मालमत्ता आणि 4 बँक खात्यांमधील 16.41 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण डॉ झाकीर हुसेन मेमोरियल ट्रस्टमधील घोटाळ्याशी संबंधित आहे.
ट्रस्टचे पैसे वैयक्तिकरित्या वापरल्याचा आरोप आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी लुईस खुर्शीद आणि इतर आरोपींविरुद्ध 17 प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाचा ताबा ईडीने घेतल्यानंतर पीएमएलए अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता.
काय आहे प्रकरण?
2009-2010 या वर्षात डॉ. झाकीर हुसेन मेमोरियल ट्रस्टद्वारे जवळपास 17 शिबिरे आयोजित करून अपंगांना कृत्रिम अवयवांचे उपकरण वाटपाच्या प्रकरणात फसवणूक केल्याचा आरोप होता. दरम्यान, 2017 मध्ये हे प्रकरण औपचारिकपणे लोकांसमोर आले, जेव्हा या प्रकरणी अनेक गुन्हे दाखल झाले. त्यावेळी अनेक दिव्यांगांना कृत्रिम अवयवदानाची उपकरणे वितरीत करण्यात आली नसून, त्यासाठीचे बिल अदा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे याप्रकरणी फर्रुखाबादच्या भोजीपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
या प्रकरणात दिव्यांगांना कृत्रिम अवयवदानाची उपकरणे वाटप करताना विकास गट भोजीपुरा येथे बनावट शिक्का, बनावट स्वाक्षरी आणि सरकारी पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणाचा तपास केल्यानंतर स्थानिक पोलिसांनी आरोपपत्रही दाखल केले आहे. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर राहण्यासाठी अनेकवेळा वॉरंट बजावण्यात आले आणि त्यावेळी अटक होण्याची शक्यता होती, मात्र नंतर दोन्ही आरोपींना न्यायालयाकडून दिलासा मिळाला होता.