Arvind Kejriwal News ईडी हादरली! केजरीवालांनी बड्या अधिकाऱ्यांची हेरगिरी केली; कालच्या छाप्यात धक्कादायक कागदपत्रं सापडली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 12:56 PM2024-03-22T12:56:59+5:302024-03-22T12:57:23+5:30
Arvind Kejriwal ED Arrested Update: अटकेला विरोध करणारी याचिका केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. ही याचिका मागे घेण्यात आली आहे.
दिल्ली हायकोर्टाने अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal यांना अटकेपासून संरक्षण देण्यास नकार दिल्याने ईडीने सायंकाळी केजरीवाल यांच्या निवासस्थानी धाड टाकली होती. यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. या झडतीत ईडीला काही कागदपत्रे सापडली होती. यातील आपल्याच दोन बड्या अधिकाऱ्यांची नावे पाहून ईडीचे अधिकारी हादरले आहेत.
अबकारी घोटाळ्यात अटक झालेल्या केजरीवाल यांनी ईडी अधिकाऱ्यांवर पाळत ठेवल्याचे या कागदपत्रांमधून ईडीला समजले आहे. केजरीवालांच्या घरात सापडलेल्या कागदपत्रांमध्ये दोन अधिकाऱ्यांची नावे, त्यांचे पत्ते आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नाव, फोन नंबर आदी सापडले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे यातील एक अधिकारी प्रत्यक्ष छाप्यावेळी केजरीवालांच्या घरात हजर होता. आजतकने सुत्रांच्या हवाल्याने याचे वृत्त दिले आहे. ईडीने या अधिकाऱ्यांची नावे सांगितली नसून स्पेशल डायरेक्टर रँक आणि जॉईंट डायरेक्टर या पदांवरील हे दोन अधिकारी असल्याचे सांगितले आहे. हे पुरावे ईडी कोर्टात मांडणार आहे.
याचबरोबर अबकारी घोटाळ्यातील पैसा आपने गोव्यातील निवडणुकीत वापरल्याचा आरोप ईडीने केला आहे. ईडीने याप्रकरणी गोव्यातील आप उमेदवारांचा जबाबही नोंदविला आहे. या उमेदवारांनुसार निवडणूक लढण्यासाठी त्यांना पैसे दिले गेले होते, ईडीनुसार हे पैसे तेच होते जे दारु घोटाळ्यात पक्षाला मिळाले होते.
दरम्यान, अटकेला विरोध करणारी याचिका केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. ही याचिका मागे घेण्यात आली आहे. केजरीवालांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी रिमांड आणि आव्हानाची याचिका विरोधाभासी असल्याने एक याचिका मागे घेत असल्याचे कोर्टाला कारण दिले आहे.