अमेरिकन करोडपती नेव्हिल रॉय सिंघम यांना ईडीचे समन्स, 'न्यूजक्लिक'ला लाखो डॉलर्सचे फंडिंग केल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 11:30 AM2023-11-16T11:30:28+5:302023-11-16T11:39:54+5:30
NewsClick Row : गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अमेरिकन करोडपती नेव्हिल रॉय सिंघम यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे.
नवी दिल्ली : 'न्यूजक्लिक' या न्यूज पोर्टलचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्यावर देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून कारवाई सुरू आहे. दरम्यान, याप्रकरणी गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अमेरिकन करोडपती नेव्हिल रॉय सिंघम यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे.
अमेरिकन उद्योगपती आणि आयटी सल्लागार कंपनी थॉटवर्क्सचे माजी अध्यक्ष नेव्हिल रॉय सिंघम हे गेल्या काही दिवसांपासून राजकारणात सक्रिय आहेत. द न्यूयॉर्क टाईम्सच्या (NYT) तपासणीनुसार, त्यांनी 'न्यूजक्लिक'ला लाखो डॉलर्सचे फंडिंग केले आहे.
The Enforcement Directorate has issued summons to American millionaire Neville Roy Singham in connection with the NewsClick terror case: Sources
— ANI (@ANI) November 16, 2023
दरम्यान, काही दिवसांपूर्वी चीनच्या बाजूने प्रायोजित बातम्या चालवल्याबद्दल चिनी कंपन्यांद्वारे 38 कोटी रुपयांच्या फंडिंग प्रकरणी आरोपी असलेल्या न्यूज पोर्टल 'न्यूजक्लिक'ने उच्च न्यायालयाकडे खटले रद्द करण्याची मागणी केली आहे.
UAPA अंतर्गत गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांनी 'न्यूजक्लिक'चे एचआर विभाग प्रमुख अमित चक्रवर्ती आणि 'न्यूजक्लिक' चे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांच्या विरोधात UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला होता आणि 3 ऑक्टोबर रोजी त्यांना अटक केली होती. तसेच, दक्षिण दिल्लीतील साकेत येथील 'न्यूजक्लिक'चे कार्यालयही सील करण्यात आले. चीनच्या समर्थनार्थ प्रचारासाठी पैसे मिळाल्याच्या आरोपानंतर 'न्यूजक्लिक'वर ही कारवाई करण्यात आली.