मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौथे समन्स, चौकशीसाठी बोलावले; नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 09:46 AM2024-01-13T09:46:35+5:302024-01-13T09:49:43+5:30
दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा एकदा समन्स बजावले असून त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. ईडीने केजरीवाल यांना पाठवलेले हे चौथे समन्स आहे.
दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी ईडीने पुन्हा एकदा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावले असून त्यांना १८ जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. मद्य धोरण प्रकरणी ईडीने मुख्यमंत्री केजरीवाल यांना पाठवलेले हे चौथे समन्स आहे, याआधी त्यांना २ नोव्हेंबर, २१ डिसेंबर आणि ३ जानेवारीला तीन समन्स बजावण्यात आले होते पण केजरीवाल चौकशीसाठी गेले नाहीत. आता या चौथ्या समन्सनंतर अरविंद केजरीवाल ईडीसमोर हजर राहतात की नाही याची जोरदार चर्चा सुरू आहे. या समन्सवर आम आदमी पक्षाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
नितीश कुमार संयोजक नको, TMCचा सूर? INDIA आघाडीच्या बैठकीकडे ममता बॅनर्जींची पाठ!
ईडीने सातत्याने समन्स जारी केल्यानंतर, आम आदमी पार्टीचा दावा आहे की, अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठी ही सर्व प्रक्रिया केली जात आहे. ईडी त्यांना चौकशीच्या बहाण्याने बोलावून अटक करू इच्छित आहे. आप'चे म्हणणे आहे की जर ईडीला चौकशी करायची असेल तर ते आपले प्रश्न लिहून केजरीवाल यांना देऊ शकतात.
काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी केजरीवाल यांच्या अटकेची भीती व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. ईडी आज अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर छापा टाकून त्यांना अटक करू शकते, असा दावा आप नेत्यांनी केला होता. दिल्ली सरकारचे मंत्री आतिशी, सौरभ भारद्वाज आणि राज्यसभा खासदार संदीप पाठक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दावा केला होता की, ईडी आज केजरीवाल यांच्या घरावर छापा टाकू शकते, त्यानंतर त्यांना अटक केली जाऊ शकते.
भाजपनेही भाजपनेही या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे प्रवक्ते हरीश खुराणा यांनी म्हटले आहे की, आतिशी किंवा इतर आप नेत्यांना आकर्षक कथा रचण्यात मजा येते. विपश्यना तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कायदा नाही. खासदार निवडणुका महत्त्वाच्या आहेत, कायदा नाही. अरविंद केजरीवाल स्वतःला कायद्यापेक्षा वरचे समजतात, असा आरोपही त्यांनी केला.