ईडी आज मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची चौकशी करणार, अतिरिक्त सुरक्षा दल तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 08:32 AM2024-01-31T08:32:22+5:302024-01-31T08:57:58+5:30
जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने आतापर्यंत 14 जणांना अटक केली आहे.
Hemant Soren ( Marathi News) रांची : कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज रांची येथे ईडी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची चौकशी करणार आहे. ईडीला लिहिलेल्या पत्रात हेमंत सोरेन यांनी आज दुपारी 1 वाजता चौकशीसाठी हजर राहीन, असे म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर निमलष्करी दलाच्या अतिरिक्त तुकड्या तैनात केल्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने आपल्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्याची मागणी केंद्राकडे आधीच केली होती. दरम्यान, जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने आतापर्यंत 14 जणांना अटक केली आहे. ज्यामध्ये 2011 च्या बॅचचे IAS अधिकारी छवी रंजन यांचाही समावेश आहे.
सोमवारी ईडीचे पथक दिल्लीत दिवसभर त्यांचा शोध घेत होते, मात्र हेमंत सोरेनचा यांचा शोध लागला नाही. यानंतर मंगळवारी हेमंत सोरेन हे अतिशय नाट्यमय पद्धतीने रांचीला पोहोचले आणि तिथे त्यांनी झारखंड मुक्ती मोर्चाच्या (झामुमो) आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी कल्पना सोरेनही उपस्थित होत्या.
ईडीच्या तपासामुळे झारखंडमध्ये राजकीय पेच निर्माण झाला आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे (झामुमो) काही आमदार रांचीच्या सर्किट हाऊसमध्ये थांबले आहेत. मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कल्पना सोरेन यांच्या नावाची राजकीय वर्तुळात वेगाने चर्चा होत आहे.
दरम्यान, हेमंत सोरेन यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. दुसरीकडे, भाजपने सीएम सोरेन यांना बेपत्ता मुख्यमंत्री म्हणून संबोधले असून झारखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही केली आहे. तसेच, हेमंत सोरेन यांना त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्री बनवायचे आहे, असे भाजप नेते निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे.
हेमंत सोरेन यांची बीएमडब्ल्यू कार जप्त
दरम्यान, कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन अडचणीत सापडले आहेत.सोमवारी ईडीने त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर छापा टाकला होता. यावेळी ईडीच्या पथकाने काही कागदपत्रे आणि हेमंत सोरेन यांची बीएमडब्ल्यू कार जप्त केली होती.