ईडी ना केजरीवालांच्या घरी छापा टाकणार, ना अटक करणार; वेगळीच रणनिती आखणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 11:02 AM2024-01-04T11:02:51+5:302024-01-04T11:03:22+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ईडीच्या तिसऱ्या नोटीसीला जुमानलेले नाहीय, यावरून आपने ईडी छापा मारणार व केजरीवालांना अटक करणार असल्याचा दावा करत आहे.
दिल्ली अबकारी घोटळ्यात आज ईडी अरविंद केजरीवाल यांच्या घरी छापे मारणार असल्याचा दावा आपने केला होता. तसेच त्यांना नंतर अटकही करणार असल्याचे म्हटले होते. परंतु, ईडीने केजरीवालांच्या घरी छापा मारणार असल्याची ती अफवा असल्याचे म्हटले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ईडीच्या तिसऱ्या नोटीसीला न जुमानता पत्र पाठविले आहे. यामध्ये आपल्यावर काय आरोप ठेवण्यात आले आहेत आणि कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत याचे लेखी मागितले आहे. केजरीवालांच्या पत्रावर ईडी विचार करत असल्याचे ईडीशी संबंधीत लोकांनी म्हटले आहे. यानंतर केजरीवाल यांना चौथा समन्स पाठविला जाणार आहे.
अबकारी घोटाळाप्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तीनवेळा नोटीस बजावली होती. तरीही केजरीवाल ईडीसमोर चौकशीला हजर न झाल्याने आता ईडी काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज अरविंद केजरीवाल यांच्या घरावर छापा टाकला जाईल आणि त्यांना अटकही केली जाईल, अशी माहिती आम्हाला विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. समन्स पाठवण्याची वेळ आणि त्यांना अटक करण्याचा प्लॅन हे लोकसभा निवडणुकीशी संबंधित असल्याचे आता स्पष्ट झाले आहे, असा आरोप आतिशी यांनी केला आहे. आजपर्यंत एक रुपयाही रोख, सोने, चांदी किंवा कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेची कागदपत्रे जप्त केलेली नाहीत. गेल्या वर्षभरापासून तपास सुरु आहे. मग तीन आठवड्यांत तीन समन्स पाठविण्याची एवढी काय घाई झाली, असा सवालही आतिशी यांनी केला आहे.