घोटाळ्यातील पीडितांचे पैसे ईडी परत देणार, मोदी सरकारचा मोठा निर्णय; ED ची मोठी तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 10:20 AM2024-08-05T10:20:18+5:302024-08-05T10:21:07+5:30
एखाद्या घोटाळ्यातील जप्त केलेले पैसे आता पीडितांना परत मिळणार आहेत. याबाबत आता ईडीने मोठी तयारी केली आहे.
चिटफंड, लॉटरी अशा योजनांमध्ये पैसे गमावणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. असे घोटाळे समोर आल्यानंतर ईडी पैसे जप्त करत असते, आता हे पैसे पीडितांना देण्यासाठी ईडी मोठी मोठी तयारी करत आहे. ईडीने काही दिवसापूर्वी एका घोटाळ्यात कोलकातामध्ये १२ कोटी रुपये जप्त केले होते, आता ही रक्कम पीडितांना मिळणार आहे. ही रक्कम कोलकात्याच्या रोझ व्हॅली ग्रुपच्या कंपन्यांमध्ये जमा केलेल्या २२ लाख पीडितांमध्ये वितरित करणार आहे. या कंपनीने ठेवीदारांना भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली होती.
वक्फ बोर्डाच्या शक्तींमध्ये हस्तक्षेप कदापी मंजूर नाही, एकत्र या; मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा विरोध
या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या विशेष पीएमएलए न्यायालयाने २४ जुलै रोजी कोलकाता येथील ईडीला रोझ व्हॅली घोटाळ्यानंतर जप्त केलेली ११.९९ कोटी रुपयांची रक्कम 'ॲसेट डिस्पोजल कमिटी'कडे हस्तांतरित करण्यास सांगितले. ईडीने कंपनीच्या १४ मालमत्ता जप्त करून ही रक्कम वसूल केली आहे. न्यायालयाने ही रक्कम पीडित ग्राहकांना देण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, आता न्यायालयाच्या आदेशाची ईडी अंमलबजावणी करणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता पीडितांची रक्कम परत मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत आश्वासनही दिले होते. ईडी देशभरातील घोटाळे आणि घोटाळे करणाऱ्यांकडून मिळालेला पैसा जप्त पीडितांना परत देणार आहे.
पश्चिम बंगालमधील घोटाळा काय?
पश्चिम बंगालमध्ये २०१३ मध्ये झालेला रोझ व्हॅली घोटाळा हा मोठा आर्थिक घोटाळा आहे. हा घोटाळा शारदा घोटाळ्यापेक्षाही मोठा होता,ईडीने दिलेल्या माहितीनुसार, भारतभरातील गुंतवणूकदारांकडून १७,५२० कोटी रुपये गोळा केले. ऑल इंडिया स्मॉल डिपॉझिटर्स युनियनने ही रक्कम ४०,००० कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे, तर काही अहवालांमध्ये ही रक्कम ६०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे.
रोझ व्हॅली घोटाळा प्रकरणी ईडी आणि बाजार नियामक सेबीही कारवाई करत आहे. या कंपनीने बेकायदेशीर योजनांद्वारे जनतेकडून जमा केलेला पैसा वसूल करण्यासाठी सेबी कंपन्यांच्या मालमत्तेचा लिलाव करत आहे.