...तर यंदाची दिवाळी 'महागडी' ठरणार; सामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 02:57 AM2020-10-10T02:57:04+5:302020-10-10T07:36:00+5:30
आयात घसरल्याने तुटवडा; साठेबाजी होत असल्याचीही शंका : सर्वसामान्यांना फटका
- नामदेव मोरे
नवी मुंबई : भाजीपाला व डाळींप्रमाणे खाद्यतेलांच्या किमतीही भडकल्या आहेत. तेलांच्या किमतीमध्ये जवळपास २५ टक्के वाढ झाली आहे. आयात घसरल्यामुळे देशभर तुटवडा निर्माण झाला आहे. तेलाची साठेबाजी सुरू असल्याचीही शंका व्यक्त केली जात आहे. ठोस उपाययोजना न केल्यास दसरा व दिवाळीतही दरवाढीचा फटका सामान्य नागरिकांना बसणार आहे.
देशातील तेलाचे उत्पादन व मागणी यामध्ये तफावत असल्यामुळे प्रत्येक वर्षी सोयाबीन व सूर्यफुल तेलाची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. जवळपास १५० लाख टन तेलाची प्रत्येक वर्षी आयात केली जाते. मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर त्याचा परिणाम तेलाच्या आयातीवरही झाला. यामुळे देशभर तेलाचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. भारतात अमेरिका, अर्जेंटिना व ब्राझीलमधून मोठ्या प्रमाणात तेल आयात होत असते. परंतु या वर्षी तेथेही समाधानकारक उत्पादन होणार नसल्याची शक्यता असल्यामुळे त्याचा परिणाम तेलाच्या दरवाढीवर झाला आहे.
गेल्या महिन्यात सूर्यफुल ९० रुपये किलो दराने विकले जात होते. तेच दर आता १३० रुपयांवर गेले आहेत. सोयाबीन तेल ८५ ते ९० वरून १२० रुपयांवर, शेंगतेल १२० रुपयांवरून १४० ते १६० रुपयांवर व पामतेल ९० ते ९५ रुपयांवरून ११० रुपयांवर पोहोचले आहे. दसरा व दिवाळीमध्ये तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. मार्केटमध्ये पुरेसा साठा उपलब्ध झाला नाही, तर दर अजून भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
साठेबाजांवर कारवाईची गरज
हॉटेल्स सुरू झाल्यामुळे तेलाची मागणी वाढली आहे. दसरा व दिवाळीमध्ये मागणी दुप्पट होणार असल्यामुळे तेलाची साठेबाजी सुरू झाली असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोरोनामुळे आरोग्याविषयी जागरूकता वाढून मोहरीच्या तेलाला मागणी प्रचंड वाढली असून, मोहरीचीही मोठ्या प्रमाणात साठेबाजी झाली असून साठेबाजांवर कारवाईची मागणी होत आहे.
कोरोनामुळे तेलाची पुरेशी आयात होऊ शकली नसल्यामुळे देशात तुटवडा निर्माण होऊन भाववाढ झाली आहे. अमेरिका, अर्जेंटिना, ब्राझीलमध्ये या वर्षी समाधानकारक पीक नसल्याने त्याचा परिणामही दरांवर होत असून पुढील काही दिवस तेजी कायम राहील.
- श्रीकांत कुवळेकर, कृषी पणन व वायदेबाजार तज्ज्ञ
किरकोळ मार्केटमधील प्रतिकिलो तेलाचे दर
प्रकार सप्टेंबर ऑक्टोबर
सूर्यफूल 90-100 120-130
सोयाबीन 85-90 110-120
पामतेल 80-85 90-110
शेंगतेल 110-120 140-150