गुड न्यूज! सर्वसामान्यांना मोठा दिलासा, खाद्यतेल झालं स्वस्त; 'हे' आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 01:07 PM2021-12-12T13:07:21+5:302021-12-12T13:22:19+5:30
Edible Oil Prices Down : महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. पण आता सर्वसामान्यांसाठी एक खूशखबर असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. पण आता सर्वसामान्यांसाठी एक खूशखबर असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खाद्यतेल स्वस्त झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या दरात घट झाली आहे. आयात शुल्कात (Import Duties) कपात केल्यामुळे खाद्यतेलाच्या किमती गेल्या महिनाभरात 8 ते 10 रुपयांनी कमी झाल्या आहेत. तसेच येणाऱ्या काही दिवसांत किमती आणखी 3-4 रुपये प्रति लीटरने कमी होतील. यामुळे ग्राहकांना आणखी दिलासा मिळू शकतो अशी माहिती मिळत आहे.
इंडस्ट्री बॉडी सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन (SEA) ने दिलेल्या माहितीनुसार, तेलबियांचे वाढलेले देशांतर्गत उत्पादन आणि जागतिक बाजारपेठेतील मंदीचा कल यामुळे आगामी महिन्यांत खाद्यतेलाच्या किमती 3-4 रुपये प्रति लीटरने आणखी कमी होऊ शकतात. SEA चे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "गेले काही महिने पाम, सोया आणि सूर्यफूल सारख्या सर्व तेलांच्या आंतरराष्ट्रीय किमतींमुळे भारतीय खाद्यतेल ग्राहकांसाठी ते खूप त्रासदायक ठरत होते."
"SEA ने आपल्या सदस्यांना दिवाळीपूर्वी शक्य तितक्या किमती कमी करण्याचा सल्ला दिला होता. आम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की, केंद्राने खाद्यतेलांवरील आयात शुल्कही कमी केले आहे. अनेक उपायांमुळे गेल्या 30 दिवसांत खाद्यतेलाच्या किमती सुमारे 8-10 रुपये खाली आल्या आहेत." SEA ने सांगितले की, त्यांच्या सदस्यांनी कमी किमतीचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी याआधीही पावलं उचलली आहेत.
3-4 रुपये प्रति लीटरने होतील कमी
चतुर्वेदी यांनी त्यांच्या सदस्यांनी तेलाच्या कमी किमतीचे फायदे ग्राहकांना देण्याचे मान्य केले आहे. त्यांच्या मते, येणाऱ्या काही दिवसात त्यांच्या सदस्यांकडून किमती आणखी 3-4 रुपये प्रति लीटरने कमी होतील. यामुळे सणासुदीच्या काळात खाद्यतेल ग्राहकांना दिलासा मिळू शकतो असं म्हटलं आहे. यासोबतच खाद्यतेलाच्या किमती आता नियंत्रणात राहणार असल्याची आशा असल्याचं देखील सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.