संबित पात्रांनी शेअर केलेला 'तो' व्हिडिओ एडिटेड, जाणून घ्या व्हायरल सत्य
By महेश गलांडे | Published: January 31, 2021 08:23 AM2021-01-31T08:23:28+5:302021-01-31T08:35:53+5:30
दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनी जो हिंसाचार झाला, त्यामागे हात असलेल्या व्यक्ती व राजकीय पक्षावर कडक कारवाई करा, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली होती.
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीच्या सीमारेषेवर गेल्या 2 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून शेतकऱ्यांचं आदोलन सुरु आहे. विरोधी पक्षांतील जवळपास सर्वच पक्षांनी या आंदोलनास पाठिंबा दिला असून शक्य ती मदतही केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनीही या आंदोलनात सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचा संदेश दिला. तसेच, केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत, अशी मागणीही केली आहे.
दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनी जो हिंसाचार झाला, त्यामागे हात असलेल्या व्यक्ती व राजकीय पक्षावर कडक कारवाई करा, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली होती. आप या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये केजरीवाल म्हणाले, शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये जो हिंसाचार घडला तो दुर्दैवी होता. शेतकऱ्यांचे प्रश्न अद्याप सुटले नसल्याने त्यांचे आंदोलन यापुढेही सुरूच राहणार आहे. आप पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. त्यानंतर, सोशल मीडियावर अरविंद केजरीवाल यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि ओनजीसीचे संचालक संबित पात्रा यांनीही हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे, अनेक ट्विटर अकाऊंट्सने हा व्हिडिओ शेअर करुन केजरीवाल यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र, केंद्र सरकारच्या नवीन तिन्ही कृषी कायद्याचं समर्थन करणारा अरविंद केजरीवाल यांचा हा व्हिडिओ एटिडेट असल्याचा दावा एका फॅक्ट चेक वेबसाईटने केला आहे.
तीनो farm bills के लाभ गिनाते हुए ...Sir जी: pic.twitter.com/nBu1u7gkS7
— Sambit Patra (@sambitswaraj) January 30, 2021
संबित पात्रा यांनी एडिट केलेला व्हिडिओ शेअर केला आहे. एका मुलाखतीमधील केवळ 18 सेकंदाचा हा भाग सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. सोशल मीडियावरही अनेकांनी हा व्हिडिओ एडिटेड असल्याचं सांगितलं आहे. या व्हिडितो 18 सेकंदाची क्लीप एका मुलाखतीमधील अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांना एकत्र करुन बनविण्यात आली आहे. झी पंजाब हरयाणा हिमाचल यांनी अरविंद केजरीवाल यांचा तो संपूर्ण मुलाखतीचा व्हिडिओ 15 जानेवारी 2021 रोजी अपलोड केला आहे. वृत्तवाहिनीचे संपादक दिलीप तिवारी आणि जगदीप साधु यांनी ही मुलाखत घेतली आहे. यासंदर्भात एल्ट न्यूज वेबसाईटने संपूर्ण मुलाखतीचा व्हिडिओ आणि त्यातील बारकावे शेअर करत, संबित पात्रा हे चुकीचा मेसेज पसरवत असल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, या 18 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये, शेतकऱ्यांची जमिन नाही जाणार, त्यांचा एमएसपी नाही जाणार, बाजार समिती नाही जाणार, शेतकरी कुठेही आपला माल विकू शकतो, त्याच्या मालाला आता चांगला भाव मिळेल, असे अरविंद केजरीवाल म्हणताना दिसत आहे. मात्र, एकाच मुलाखतीमधील छोटे छोटे भाग तोडून जोडण्यात आल्याचं अल्ट न्यूजने म्हटलंय.
सरकार चर्चेला तयार - मोदी
नवीन कृषी कायद्यांसंदर्भात चर्चेद्वारेच तोडगा काढण्याचा केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेला प्रस्ताव अजूनही कायम आहे. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी एक दूरध्वनी करून केंद्र सरकारशी केव्हाही चर्चा करायला येऊ शकतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारीसांगितले. दिल्लीमध्ये प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये भीषण हिंसाचार झाला होता. त्या पार्श्वभूमीवर तसेच संसदेचे अधिवेशन सुरळीत चालावे, यासाठी आयोजिलेल्या सर्व पक्षांच्या गटनेत्यांच्या बैठकीत मोदी बोलत होते.