‘सुदर्शन न्यूज’च्या संपादकाला अटक
By admin | Published: April 14, 2017 01:20 AM2017-04-14T01:20:29+5:302017-04-14T01:20:29+5:30
संभळमधील वेगवेगळ््या गटांमध्ये द्वेषभावना निर्माण केल्याच्या आरोपावरून ‘सुदर्शन न्यूज’ या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश चव्हाणके
लखनौ : संभळमधील वेगवेगळ््या गटांमध्ये द्वेषभावना निर्माण केल्याच्या आरोपावरून ‘सुदर्शन न्यूज’ या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश चव्हाणके यांना अटक झाली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार संभळ पोलिसांनी चौखाने यांना बुधवारी रात्री येथील चौधरी चरणसिंह विमानतळावर अटक केली. ते येथून निघण्याच्या तयारीत होते.
धर्म, वंश, जन्माचे ठिकाण आदी मुद्द्यांवरून वेगवेगळ््या समाजात शत्रुत्व निर्माण करण्यास चिथावणी दिल्याबद्दल चौखाने यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या वेगवेगळ््या कलमान्वये १० एप्रिल रोजी संभळमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. सुदर्शन न्यूजने प्रक्षेपित केलेल्या कार्यक्रमामध्ये चव्हाणके यांनी आक्षेपार्ह आशय दिला व त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला. संभळमध्ये ९ एप्रिल रोजी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित झाल्यावर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने चौखानेविरोधात गुन्हा दाखल केला.
या वाहिनीवर ६ ते ८ एप्रिल दरम्यान प्रक्षेपित झालेल्या कार्यक्रमांकडे या बैठकीत प्रतिष्ठित नागरिकांनी शांतता समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते.
तसेच संसदेमध्येही हा प्रश्न उपस्थित झाला होता. सुदर्शन न्यूजला प्रतिक्रिया विचारली असता प्रसारमाध्यमाला धमकावण्याच्या प्रयत्नाचा आम्ही निषेध करतो, असे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
आश्वासन दिले होते...
सुदर्शन न्यूजविरोधात कारवाई केली जाईल, असे आश्वासन राज्यसभेत सरकारने बुधवारी दिले होते. सरकार कोणालाही सामाजिक सलोखा व ऐक्य बिघडवू देणार नाही, असे संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तारअब्बास नक्वी यांनी म्हटले होते.