संपादकीय - देशापुढील नक्षली आव्हान कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 06:07 AM2023-04-28T06:07:58+5:302023-04-28T06:09:05+5:30

‘छत्तीसगडमधील नक्षलींकडील शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा संपला आहे, त्यांना चारी बाजूने घेरले आहे, परिणामी, अनेक नक्षली शरण येत आहेत’, असे वरिष्ठ अधिकारी सांगत असतात

Editorial - The Naxalite Challenge Continues in india | संपादकीय - देशापुढील नक्षली आव्हान कायम

संपादकीय - देशापुढील नक्षली आव्हान कायम

googlenewsNext

छत्तीसगडचे दंतेवाडा, सुकमा आणि बिजापूर इत्यादी जिल्हे नक्षलींच्या चळवळीने ग्रस्त आहेत. गेल्या दोन वर्षांत नक्षल्यांनी कोणताही मोठा हल्ला केला नव्हता, याचा अर्थ नक्षली चळवळ संपली असा घेण्यात येऊन पाठ थोपटून घेतली जात होती. दंतेवाड्यापासून सुमारे ऐंशी किलोमीटरवर असलेल्या दर्भा विभागातील अरणपूर-नहाडी परिसरात नक्षली लपल्याची माहिती मिळताच दंतेवाडा जिल्हा राखीव दलाचे दहा जवान एका चालकासह शोधमोहिमेवर निघाले. मालवाहू टेम्पोतून या जवानांना मोहिमेसाठी नेण्याच्या काळजीत ढिलाई होती. या मोहिमेत नहाडी गावाजवळ रस्त्याखाली पेरून ठेवलेल्या आयईडीचा (इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाइस) स्फोट झाला. हा स्फोटाने रस्त्याच्या मधोमध दहा फुटाचा खड्डा पडला आणि वाहनचालकासह अकरा जवानांच्या चिंध्या झाल्या. प्रत्येक हल्ल्यानंतरच्या नेहमीच्या प्रतिक्रिया राजकीय नेते आणि मंत्र्यांनी व्यक्त केल्या.

‘छत्तीसगडमधील नक्षलींकडील शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा संपला आहे, त्यांना चारी बाजूने घेरले आहे, परिणामी, अनेक नक्षली शरण येत आहेत’, असे वरिष्ठ अधिकारी सांगत असतात. त्यांच्या दाव्यालाच नक्षल्यांनी सुरुंग लावला आहे. ज्या परिसरात शोधमोहीम आखणे आणि कारवाया करणे अत्यंत जोखमीचे असते त्या भागात जाणारे हे जवान मालवाहू टेम्पोमध्ये बसून प्रवास करीत होते. त्यांच्या मागे-पुढे आणखी सुरक्षा यंत्रणा होती की नाही, याचा तपशील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेला नाही. बस्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी म्हटले होते की, अरणपूर परिसरात नक्षलींच्या हालचाली असल्याची खबर मिळताच ही शोधमोहीम आखली होती. ही माहिती खरी असली तरी त्याप्रमाणे शोधमोहिमेची किंवा संभाव्य कारवाईची पुरेशी तयारी करण्यात आली नव्हती हे स्पष्ट दिसते आहे. शेवटचा नक्षली पकडला किंवा मारला जात नाही तोवर अतिदक्षता घेऊनच अभियान चालविण्यात आले पाहिजे. दोन वर्षांपूर्वी ३ एप्रिल २०२१ रोजी सुकमा आणि बिजापूर जिल्ह्यांच्या सीमेवर नक्षल्यांनी केलेल्या हल्ल्यात बावीस सुरक्षा जवान शहीद झाले होते. त्याच्या मागील वर्षी सुकमामध्येच हल्ला करून सतरा जवानांना मारले होते. भाजपचे आमदार भीमा मांडवी आणि त्यांच्या चार अंगरक्षक जवानांना दंतेवाडा जिल्ह्यात ठार करण्यात आले होते. ही कहाणी अनेक वर्षांची आहे. देशांतर्गत आव्हान असलेल्या या हिंसक कारवायांना रोखण्यात पूर्ण यश आलेले नाही. अशा तणावपूर्ण वातावरणात दंतेवाडा, सुकमा किंवा बिजापूर जिल्ह्यातील सामान्य माणसांचे जीवन किती कठीण होत असेल? तरुण पिढीच्या शिक्षणाची अवस्था काय असेल? रस्ते, शेती सुधारणा आदींसह विविध विकासकामांचे काय होत असेल? आरोग्य सुविधा पुरविल्या जात असतील का? एखादा मोठा हल्ला झाला तर देश हादरून जातो. तेवढ्यापुरतीच त्याची धग जाणवते. राजकीय नेतेही त्यावर संताप व्यक्त करतात. हा हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही, असा निर्धार व्यक्त केला जातो आणि पुन्हा हल्ला होईपर्यंत उर्वरित देशाला त्याचा विसरही पडून जातो. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल हे प्रामाणिक प्रयत्न करणारे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. मात्र तेवढे प्रयत्न पुरेसे नाहीत, याचे स्पष्ट संकेत मंगळवारी मध्यरात्री  नक्षल्यांनी केलेल्या हल्ल्यावरून मिळाले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मदतीचे आश्वासन दिले आहे. भूपेंद्र बघेल यांनीदेखील संयमाने या प्रकरणावर व्यक्त होत नक्षली चळवळ मोडून काढण्याचा निर्धार केला आहे. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, नक्षल्यांकडील शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा कमी झाला आहे. हा दावा फोल असल्याचे आयईडी स्फोटाने स्पष्ट झाले आहे. पोलिसांचे वाहन उडवून देण्यापूर्वी नक्षलवाद्यांनी गोळीबारही केला होता. दंतेवाडा मुख्यालयात किंवा बस्तर विभागीय महानिरीक्षकांच्या कार्यालयास नक्षलवाद्यांच्या हालचालीची माहिती मिळाली होती तर जिल्हा राखीव दलाचे जवान कसे पाठविण्यात आले? या दलात स्थानिक आदिवासी जवानांची भरती करून त्यांना प्रशिक्षण दिले जाते. अशा तरुणांना अतिप्रचंड स्फोट घडवून आणण्याची शक्यता असणाऱ्या परिसरात कसे पाठविले जाते? त्या मार्गाच्या सुरक्षेची दक्षता घेतली जात नाही, अशा त्रुटी दिसतात. ही लढाई सहज घेण्यासारखी नाही आणि नक्षल्यांचा गंभीर प्रश्न नवीनही नाही. तो प्रचंड ताकदीनेच मोडून काढायला हवा !

Web Title: Editorial - The Naxalite Challenge Continues in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.