अरविंद केजरीवाल यांना ईडीचे पाचवे समन्स; कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी बोलावले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 02:53 PM2024-01-31T14:53:56+5:302024-01-31T14:58:25+5:30
आगामी २ फेब्रुवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश ईडीने देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. ईडीने अरविंद केजरीवाल यांना पाचव्यांदा समन्स पाठवले आहे.
आगामी २ फेब्रुवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश ईडीने देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याआधी अरविंद केजरीवाल यांनी ईडीने पाठवलेल्या समन्सला सूडाची कारवाई असल्याचे म्हटले होते. यापूर्वी, ईडीने १७ जानेवारी, ३ जानेवारी, २१ डिसेंबर आणि २ नोव्हेंबर रोजी अरविंद केजरीवाल यांना समन्स पाठवले होते, परंतु ते हजर राहिले नव्हते.
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया या दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून तुरुंगात आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांना अटक करण्यात आली होती. याशिवाय आप नेते विजय नायर यांनाही याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
ED issues fresh summons to Delhi Chief Minister and AAP national convener Arvind Kejriwal to join investigation on February 2 in its ongoing probe in Delhi Excise policy case: Sources
— ANI (@ANI) January 31, 2024
(File photo) pic.twitter.com/ShfQMOoPXp
काय आहे मद्य घोटाळा?
दिल्लीच्या केजरीवाल सरकारने नोव्हेंबर २०२१मध्ये राज्यात नवीन दारू धोरण लागू केले होते. या धोरणानुसार दिल्लीची ३२ झोनमध्ये विभागणी करण्यात आली. नियमानुसार प्रत्येक झोनमध्ये २७ दारूची दुकाने सुरू करायची होती. यासोबतच सरकारने आपल्या धोरणानुसार सर्व दारू दुकानांचे खासगीकरण केले होते. दुकानांचे खाजगीकरण केल्याने दिल्लीला अंदाजे ३५०० कोटी रुपयांचा फायदा होईल, असा केजरीवाल सरकारचा तर्क होता. पण, दारूविक्रीत वाढ होऊनही महसुलात तोटा झाला आणि या निर्णयाचा सरकारला फटका बसला. यानंतर धोरणावर प्रश्न उपस्थित होऊ लागले.