मिसा भारतीवरही ईडीचे छापे
By Admin | Published: July 9, 2017 12:32 AM2017-07-09T00:32:09+5:302017-07-09T00:32:09+5:30
लालूप्रसाद यादव यांची कन्या आणि राज्यसभा सदस्य मिसा भारती, त्यांचे पती शैलेश कुमार यांच्या दिल्लीस्थित तीन फार्महाउसवर सक्तवसुली संचालनालयाने
- लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : लालूप्रसाद यादव यांची कन्या आणि राज्यसभा सदस्य मिसा भारती, त्यांचे पती शैलेश कुमार यांच्या दिल्लीस्थित तीन फार्महाउसवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँडरिंग प्रकरणात शनिवारी धाडी टाकल्या. लालूप्रसाद यादव यांच्या १२ ठिकाणांवर सीबीआयने शुक्रवारी टाकलेल्या धाडीनंतर यादव कुटुंबांशी संबंधित आज ही दुसरी कारवाई आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीतील घिटोरनी, बिजवासन आणि सैनिक फार्म हाउसवर सकाळी धाडी टाकल्या. ही फार्महाउस मिसा, त्यांचे पती शैलेश कुमार अँड मेसर्स मिसाइल प्रिंटर्स अँड पॅकर्स प्रा.लि.शी संबंधित आहेत. ईडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आणखी दोन ठिकाणांवर आमचे लक्ष असून, त्यांचा तपास नंतर करण्यात येणार आहे.
या धाडी सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र जैन या भावांसह अन्य लोकांविरुद्ध असलेल्या मनी लाँडरिंगच्या एका प्रकरणाशी संबंधित आहेत.
सीए राजेश अग्रवाल यांनाही अटक
मिसा यांच्याशी संबंधित सीए राजेश अग्रवाल यांनाही अटक करण्यात आली आहे. अग्रवाल यांनी मिसाइल प्रिंटर्स अँड पॅकर्स लिमिटेडमध्ये ६० लाख रुपयांची अॅकोमोडेशन एंट्री केली होती. मिसा यांच्याकडून शेअर खरेदी करण्यापूर्वी ही फर्म २५, तुघलक रोडवर नोंदणीकृत होती. २००९ -१० मध्ये याचा पत्ता बदलून बिजवासन झाला.