ईडीचे समन्स आता क्यू-आर कोडसह, निपॉन कंपनीच्या नावे बोगस समन्सनंतर निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 01:46 PM2022-11-23T13:46:03+5:302022-11-23T13:46:48+5:30
ईडीने यासंदर्भात एक प्रसिद्धिपत्रक जारी केले आहे. ईडीकडून प्राप्त माहितीनुसार, बोगस समन्स जारी करत लोकांची लूटमार करणाऱ्या एका टोळीचा ईडीच्या अधिकाऱ्यांनी नुकताच पर्दाफाश केला.
मुंबई : रंगनिर्मिती करणाऱ्या निपॉन कंपनीला ईडीच्या नावे बोगस समन्स पाठवत कंपनीकडून २० कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रकार उजेडात आल्यानंतर आता ईडीने (सक्तवसुली संचालनालय) आपल्या समन्सवर क्यू-आर कोड प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. या क्यू-आरकोडमुळे ज्याच्या नावे समन्स आहे, अशा व्यक्तीला तो क्यू-आरकोड स्कॅन करून त्याच्या समन्सची सत्यता पडताळून पाहता येईल.
ईडीने यासंदर्भात एक प्रसिद्धिपत्रक जारी केले आहे. ईडीकडून प्राप्त माहितीनुसार, बोगस समन्स जारी करत लोकांची लूटमार करणाऱ्या एका टोळीचा ईडीच्या अधिकाऱ्यांनी नुकताच पर्दाफाश केला. रंगनिर्मितीमधील निपॉन कंपनीला अलीकडे असेच एक बोगस समन्स आले होते. या समन्सनुसार कंपनीच्या संचालकांना मनी लॉड्रिंग कायद्यांतर्गत ईडीच्या दिल्ली येथील कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. यानंतर, ज्या टोळीने हे समन्स पाठविले होते, त्यांनी कंपनीच्या संचालकांशी संपर्क करत आपली ईडीच्या अधिकाऱ्यांशी चांगली ओळख आहे.
प्रकरण मिटविण्यासाठी आपण मदत करू शकतो, असे सांगत त्यांच्याकडे २० कोटी रुपयांची मागणी केली. यानंतर कंपनीने थेट ईडी कार्यालयाशी संपर्क केला आणि ही माहिती दिली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी आणि दिल्ली पोलिसांनी या कंपनीद्वारे या टोळीशी संपर्क करत त्या टोळीचा म्होरक्या अखिलेश मिश्रा याला दिल्लीस येण्यास सांगितले.
मिश्रा दिल्लीला येण्यास तयार झाला आणि कंपनीच्या संचालकांना भेटतेवेळी सरकारी बोधचिन्ह असलेल्या गाडीतून तो आला. त्याने स्वतःची ओळख ईडीचा अधिकारी आहे, अशी सांगितली. तो तिथे येताच ईडी आणि दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली. अटक करण्यात आलेला अखिलेश मिश्रा हा मुंबईचा असून, त्याच्यासोबत मुंबई, दिल्ली, बिहार, कोलकाता, गाझीपूर येथून त्याच्या टोळीतील आणखी नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
काय आहे क्यू-आर कोड प्रणाली?
- क्यू-आर कोडच्या या प्रणालीनुसार, ईडीच्या कार्यालयातर्फे इलेक्ट्रॉनिक प्रणालीतून संबंधित व्यक्तीला समन्स पाठविले जाईल.
- समन्सवर एक विशिष्ट पासकोड छापलेला असेल.
- ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला अथवा कंपनीला ईडीकडून समन्स प्राप्त होईल, त्यावेळी त्या समन्सवर असलेला बारकोड मोबाईल फोनमधील कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघितल्यास त्याद्वारे थेट ईडीच्या वेबसाईटची लिंक ओपन होईल.
- ही लिंक ओपन झाल्यावर समन्सवर छापलेला पासकोड तिथे टाकल्यास संबंधित व्यक्तीला आपल्या समन्सचे पूर्ण तपशील तेथे समजतील.
- ईडीकडून यापुढे प्रत्येक समन्सवर हा क्यू-आर कोड असेल.
- क्यू-आर कोडशिवाय आलेले समन्स हे अधिकृत नसेल, असेही ईडीने स्पष्ट केले आहे.