ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22- बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांना विदेशात पाठविलेल्या पैशांसाठी सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) प्रश्नांना सामोरं जावं लागतं आहे. ईडीच्या या प्रश्नांना फक्त अभिनेता शाहरूख खानलाच नाही तर संपूर्ण बच्चन परिवाराला ईडीच्या प्रश्नांचा सामना करावा लागतो आहे. बच्चन परिवारातील सगळ्या सदस्यांकडून ईडीने गेल्या 13 वर्षांत विदेशात पाठविलेल्या पैशांची माहिती मागवली आहे. तसंच अभिनेता अजय देवगण यालाही ईडीकडून नोटीस पाठविण्यात आली आहे. यातून अजयने देशाच्या बाहेर पाठविलेल्या पैशांची माहिती सादर करायला ईडीने सांगितलं आहे.
आणखी वाचा
अभिनेते अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन आणि अजय देवगण यांना जून महिन्यात ईडीने फेमा कायदा अंतर्गत नोटीस पाठवली होती. फेमा कायद्याच्या सेक्शन 37 अंतर्गत ईडीने तपासणी सुरू करण्याच्या आधी या कलाकारांकडून प्राथमिक माहिती मागवली जाऊ शकते. बॉलिवूडमधील एका सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन आणि त्याच्या परिवाराला 2004 नंतर एलआरएस अंतर्गत व्यावसायिक दौऱ्यादरम्यान केलेल्या विदेशी देवाण-घेवाणीची माहिती द्यायची आहे. 2004 मध्ये रिझर्व बॅकेने लिब्रलाइज्ड रेमिटेंस स्कीम ( एलआरएस )सुरू केली होती. याच अंतर्गत बच्चन परिवाराला 2004 नंतरच्या विदेशी व्यवहाराची ईडीला माहिती द्यावी लागणार असल्याचं समजतं आहे.
शाहरूखला ईडीचं समन्स
सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अभिनेता शाहरूख खान याला समन्स बजावलं होतं. आयपीएलमधील शाहरूखच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून झालेल्या परकीय चलन कायद्याच्या उल्लघंनप्रकरणी यापूर्वी शाहरूखला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. २३ जुलैला त्याला ‘ईडी’समोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नाईट रायडर्स स्पोर्टस प्रायव्हेट लिमिटेड या संघाचे समभाग मॉरिशसमधील कंपनीला मूळ किंमतीपेक्षा कमी भावात विकण्यात आले होते. त्यामुळे कंपनीला तब्बल ७३.६ कोटी रूपयांचा तोटा झाला होता. याप्रकरणी मार्च महिन्यात ईडीने शाहरूख खान, त्याची पत्नी गौरी खान, अभिनेत्री जुही चावला आणि अन्य काही जणांना या नुकसानासाठी कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स या संघाची मालकी नाईट रायडर्स स्पोर्टस प्रायव्हेट लिमिटेड आहे. सूत्रांच्या माहितीनूसार ‘ईडी’ला तपासणीदरम्यान समभाग विक्रीच्या या तब्बल १०० कोटींच्या व्यवहारात परकीय चलन कायद्याचं उल्लंघन करण्यात आल्याचं निदर्शनास आलं होतं. जय मेहता यांच्या मालकीच्या सी आईसलँड इन्व्हेस्टमेंट आणि कोलकाता नाईट रायडर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात हा व्यवहार झाला आहे. नाइट रायडर्स स्पोर्ट्स ही मॉरिशसमधील नोंदणीकृत कंपनी असून, तिची मालकी शाहरूखची रेड चिली कंपनी आणि अभिनेत्री जुही चावला व तिचा पती जय मेहता यांच्याकडे आहे. २००८-०९ मध्ये शाहरूखने या कंपनीचे काही समभाग आपल्याच भागीदाराला स्वस्तात विकले. एक समभाग ७० ते ८६ रुपयांना विकायला हवा होता, तो त्याने जय मेहताच्या सी आयलंड इन्व्हेस्टमेन्ट या कंपनीला दहा रुपयांना विकला. हा व्यवहार करताना जाणुनबुजून समभागांची किंमत कमी दाखवली गेल्याचा संशय आहे. या संपूर्ण व्यवहारात मोठ्याप्रमाणावर अनियमितता असून यामध्ये समभाग मुल्यांकनाबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्याचं ईडीचं म्हणणं आहे.
Web Title: Edu notice of Shahrukh, Ajay Devgan and Bachchan family
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.