शिक्षणाचे, देशाचे भगवेकरण करू!
By admin | Published: June 21, 2016 07:33 AM2016-06-21T07:33:31+5:302016-06-21T07:33:31+5:30
शिक्षणाचे आणि देशाचे भगवेकरण केले जाईल. यातील जे देशासाठी चांगले असेल ते घडेल, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री रामशंकर कथेरिया यांनी म्हटले.
लखनौ : शिक्षणाचे आणि देशाचे भगवेकरण केले जाईल. यातील जे देशासाठी चांगले असेल ते घडेल, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री रामशंकर कथेरिया यांनी म्हटले. शिक्षणाचे आणि देशात भगवेकरण केले जाईल, असे मी म्हणतोय. भगवेकरण म्हणा की संघवाद. तो जर देशासाठी चांगला असेल, तर तसे निश्चितपणे घडेल.
कथेरिया येथे लखनौ विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४२ व्या राज्याभिषेक दिनानिमित्त ‘हिंदवी स्वराज दिवस समारोह’ कार्यक्रमात बोलत होते. कथेरिया यांच्या या विधानामुळे मोदी सरकारवर टीका करण्यासाठी विरोधकांना आयतेच निमित्त मिळाले आहे.
भगवेकरण देशाच्या लाभाचे आहे. देशाच्या चांगल्यासाठी जे काही आहे, मग तुम्ही त्याला भगवेकरण म्हणा की संघवाद, परंतु ते केले जाईल, असे ते म्हणाले. आम्ही प्रदीर्घ काळापासून हे बघत आहोत. देश जगात अभिमानाने ज्यावर उभा राहू शकतो, अशा गोष्टी अभ्यासक्रमाचा भाग बनवायच्या नाहीत का? त्या गोष्टी आमच्या मुलांना शिकवायच्या नाहीत का? महाराणा प्रताप किंवा शिवाजी महाराज यांच्याबद्दल विद्यार्थी वाचन करणार नसतील, तर ते घेंगीस खानाबद्दल वाचतील. शिवाजी महाराजांमुळे स्वातंत्र्यासाठी प्रेरणा मिळाली. भारताचा इतिहास हा काही लोकांना सोयीचा व्हावा, असा बनविण्यात आला, असा दावा करून कथेरिया यांनी असा इतिहास हा भारताचे फार मोठे दुर्दैव असल्याचे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोणी एका पक्षाची खासगी मालमत्ता किंवा दलितांची मालमत्ता समजले जाते. आंबेडकर हे केवळ आदर्श नेतेच नव्हते, तर संपूर्ण जगासाठी राष्ट्रवादी नेते होते, असे ते म्हणाले. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील थोर नेत्यांच्या त्यागाचा उल्लेख करून कथेरिया म्हणाले की, हे नेते मानवतेसाठी व देशाच्या भल्यासाठी जगले. उत्तर प्रदेशाच्या शैक्षणिक मागासलेपणासाठी त्यांनी सत्ताधारी समाजवादी पक्षाच्या सरकारला दोष दिला. (वृत्तसंस्था)
अयोध्येतील बाबरी मशीद पाडणे ही आमच्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट होती, असे सांगत त्या जागी राम मंदिर आम्ही बांधणारच, आम्हाला कोणी रोखू शकणार नाही, असा दावा भाजपाचे खा. योगी आदित्यनाथ यांनी येथे केला. बाबरी मशीद ६ डिसेंबर १९९२ रोजी पाडण्यात आली होती. त्यामुळे ६ डिसेंबर हा हिंदू शौर्य दिन म्हणून साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
‘कैराना स्थलांतर’ हा मुद्दा नाही : नायडू
मुजफ्फरनगर : २०१७ मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश राज्य विधानसभा निवडणुकीत ‘कैराना स्थलांतर’ हा मुख्य मुद्दा असणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय नगरविकास मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी केले आहे. ‘कैराना स्थलांतर हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. भाजपा केवळ विकासाच्या मुद्द्यावर येथील निवडणूक लढेल,’ असे नायडू म्हणाले.
एका विशिष्ट समाजाने दिलेल्या धमकीमुळे कैरानातील हिंदू कुटुंबांनी गाव सोडून अन्यत्र आश्रय घेतल्याचा आरोप भाजपाच्या खासदाराने केला होता. नायडू म्हणाले, ‘राज्यसभेच्या निवडणुकीत मुस्लीम उमेदवार (मुख्तार अब्बास नकवी आणि एम.जे. अकबर) उभे करणारा भाजपा हा एकमेव पक्ष आहे. राज्यसभेच्या ५७ रिक्त जागांपैकी एकाही जागेवर अन्य पक्षांनी मुस्लीम उमेदवार उभा केला नाही,’ असे नायडू म्हणाले.