मुलांच्या शिक्षणासाठी आईने किडनी काढली विकायला
By admin | Published: June 1, 2017 01:54 PM2017-06-01T13:54:18+5:302017-06-01T13:54:18+5:30
मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नसल्याने उत्तरप्रदेशमध्ये राहणा-या एका महिलेने तिची किडनी विकायला काढली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
आग्रा, दि. 1 - मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नसल्याने उत्तरप्रदेशमध्ये राहणा-या एका महिलेने तिची किडनी विकायला काढली आहे. आरती शर्मा असे या महिलेचे नाव असून, तिने फेसबुकवर किडनी विक्रीची जाहीरात दिली आहे. या महिलेच्या पदरात तीन मुली आणि एक मुलगा आहे. ग्वालिययर रोडवर इको कॉलनीमध्ये आरती तिच्या आठ जणांच्या कुटुंबासोबत राहते.
आरतीने तिच्या हाताने लिहीलेले पत्र फेसबुकवर पोस्ट केले असून, यामध्ये तिने मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीची याचना केली आहे. आरतीने दिलेल्या माहितीनुसार तिच्या नव-याचा मनोज शर्माचा छोटा गारमेंटचा व्यवसाय होता. पण नोटाबंदीच्या निर्णयानंतर त्यांचा व्यवसाय बुडाला. तिने जिल्हा प्रशासनाकडे आर्थिक मदत किंवा लोन देण्याची विनंती केली होती. पण तिला तिथून नकार मिळाला. त्यानंतर तिने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनऊ येथील निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी योगींनी तिला मदतीचे आश्वासन दिले पण आजतागयत कोणतीही मदत मिळालेली नाही असे आरतीने सांगितले.
आरती आणि तिचा नवरा फार शिकलेले नाहीत. हायस्कूलपर्यंतचे त्यांचे शिक्षण झाले आहे. माझ्यासाठी सर्व दरवाजे बंद झाले आहेत. लखनऊला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटायला जायलाही आमच्याकडे पैसे नव्हते. घरगुती गॅस सिलिंडर ब्लॅकमध्ये विकून मिळालेल्या पैशातून आम्ही लखनऊला गेलो असे आरतीने सांगितले. नोटाबंदीपूर्वी आमचे कुटुंब सुखात होते. आमची मुले चांगले आयुष्य जगत होती. आम्ही गरीबांना मदतही करायचो. आम्ही वाईट काळात दुस-यांच्या मुलींना मदत केली पण आता आमच्या मुलांना मदत करायला कोणीही नाही असे व्यथित झालेल्या आरतीने सांगितले.
किडनी विकायचा निर्णय आरतीचा होता. मी टॅक्सी चालवून महिन्याला 4 ते 5 हजार रुपये कमावतोय. घरमालकाने आम्हाला घर रिकामी करायला सांगितलेय पण जायचे कुठे हा प्रश्न आहे असे मनोजने सांगितले. आम्ही भीख मागितली नाही किंवा भविष्यातही मागणार नाही. आम्हाला कर्ज देऊन प्रशासनाने मदत करावी एवढीच आमची मागणी आहे. कर्ज मिळाले तर, आम्ही आमचा छोटा-मोठा व्यवसाय सुरु करु शकतो. पण अधिकारी आम्हाला अपमानित करतात अशी खंत मनोजने व्यक्त केली.