दोन ज्येष्ठ वैज्ञानिकांना शिक्षा
By admin | Published: September 26, 2014 03:36 AM2014-09-26T03:36:32+5:302014-09-26T03:36:32+5:30
मंगळयानाच्या यशामुळे वैज्ञानिक मंडळींवर स्तुतीसुमने उधळली जात असताना सरकारी यंत्रणेत प्रशासनाचेही काम करणारे वैज्ञानिक धास्तावले आहेत.
चेन्नई : नोकरीतून कमी केलेल्या एका कर्मचा-यास पुन्हा कामावर घेण्याचे आदेश पार सर्वोच्च न्यायालयापर्यंत होऊनही त्याचे पालन करण्यात १० वर्षे टाळाटाळ केल्याबद्दल मद्रास उच्च न्यायालयाने संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या (डीआरडीओ) दोन ज्येष्ठ वैज्ञानिकांना कारावासाची आणि दंडाची शिक्षा ठोठावली. मंगळयानाच्या यशामुळे वैज्ञानिक मंडळींवर स्तुतीसुमने उधळली जात असताना सरकारी यंत्रणेत प्रशासनाचेही काम करणारे वैज्ञानिक धास्तावले आहेत.
आवाडी, चेन्नई येथील ‘कॉम्बॅट व्हेईकल्स रीसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट’ २००१ मध्ये बंद केल्यानंतर कामावरून कमी केल्या गेलेल्या जोसेफ राज या कारकुनाने केलेल्या अवमान याचिकेवर न्या. एस. राजेश्वरन व न्या. पी. एन. प्रकाश यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. त्यानुसार ‘डीआरडीओ’चे महासंचालक व संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व्ही. के. सारस्वत व ‘डिफेन्स मेट्रलर्जिकल रीसर्च लॅबोरेटरी’चे संचालक जी. मलकोंडय्या यांना प्रत्येकी तीन आठवड्यांची साधी कैद आणि दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. खंडपीठाने नमूद केले की, हे दोघेही वैज्ञानिक सरकारमध्ये उच्च पदांवर आहेत, याची आम्हाला कल्पना आहे. परंतु पदांच्या खुर्चीमुळे त्यांची दृष्टी धूसर झाली असून, स्वत:ची काहीही चूक नसूनही अचानक नोकरीतून काढून टाकल्या गेलेल्या एका सामान्य कर्मचाऱ्यांची दयनीय अवस्था त्यांना दिसू शकली नाही. एवढेच नव्हे तर ही अवमानाची कारवाई सुरु झाल्यावरही त्यांनी जराही पश्चात्ताप दाखविला नाही.