परिस्थितीमुळे सोडले होते शिक्षण, 62 व्या वर्षी भाजपा आमदाराने दिली BA ची परीक्षा
By महेश गलांडे | Published: March 3, 2021 06:19 PM2021-03-03T18:19:31+5:302021-03-03T18:21:39+5:30
राजस्थानच्या उदयपूर ग्रामीणचे भाजपा आमदार फूलसिंह मीणा यांनी नुकतीच बीएची परीक्षा दिली. वर्धमान महावीर खुल्या विद्यापीठातून बीएची अंतिम परीक्षा फूलसिंह यांनी दिली.
उदयपूर - 40 वर्षांपूर्वीच शिक्षण सुटलं होतं, पण शिकायची जिद्द आजही कायम होती. कधी शाळेतील विद्यार्थ्यांसमोर भाषणा द्यायला लागत, तेव्हा आपण स्वत: कमी शिकल्याची जाणीव होत. आपणच शिकलो नाही, मग मुलांना काय धडे देणार, असाही मनात विचार येई. त्यामुळे, 40 वर्षांपूर्वी सुटलेलं शिक्षण पुन्हा सुरू करण्याचा विचार डोक्यात आला अन् मुलींच्या प्रेरणेनं परीक्षा कक्षापर्यंत पोहोचला.
राजस्थानच्या उदयपूर ग्रामीणचे 62 वर्षीय भाजपाआमदार फूलसिंह मीणा यांनी नुकतीच बीएची परीक्षा दिली. वर्धमान महावीर खुल्या विद्यापीठातून बीएची अंतिम परीक्षा फूलसिंह यांनी दिली. त्यावेळी, त्यांना अत्यानंद झाला होता. शालेय जीवनात असताना घरची परिस्थिती हालाखीची होती, रोजगाराच्या शोधात आपला जिल्हा भीलवाडा सोडून उदयपूरला यावे लागलं. त्यानंतर, उदयपूरमध्ये मजुरी करुन उदरनिर्वाह भागविण्यास सुरुवात केली अन् उदयपूरचे रहिवाशी बनलो, अशी भूतकाळातील आठवण आमदार फूलसिंह यांनी सांगितली.
मजूरी करत असल्यामुळे कामगार वर्गात चांगली ओळख झाली, यातूनच कामगारांच्या आग्रहास्तव उदयपूर नगरपालिकेची निवडणूक लढवल. पहिल्याच निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडूनही आले. फूलसिंह यांचा स्वभाव, जनमानसांतील प्रतिमा आणि लोकप्रियता पाहून 2013 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी भाजपाने त्यांना उमेदवारी दिली. त्यावेळीही, त्यांनी सहज विजय मिळवला, त्यानंतर आता दुसऱ्यांदा ते उदयपूर ग्रामीणचे आमदार बनले आहेत. आमदार झाल्यानंतरही आपल्या भूतकाळातील परिस्थितीच्या कटू आठवणी आणि शिक्षण सोडावे लागल्याची खंत मनात होती. त्यातच, शाळांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलविल्यानंतर खजील झाल्यासारखे वाटायचे, असे ते म्हणतात. त्यामुळे, मनात ठाण मांडून आपल्या मुलींच्या मदतीने त्यांन शिक्षण पूर्ण करण्याचा चंग बांधला.
फूलसिंह यांच्या मुलींनी 2014 साली दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरला. मात्र, आमदारकीच्या व्यस्ततेमुळे परीक्षा देणे शक्य झालं नाही. त्यानंतर, पुढच्या वर्षी पुन्हा एकदा दहावीचा फॉर्म भरला. यावेळी त्यांनी परीक्षा दिली अन् उत्तीर्णही झाले. त्यानंतर, 2016-17 मध्ये बारावीची परीक्षाही ते पास झाले. त्यामुळे मुक्त विद्यापीठातून बीएला प्रवेश घेतला. यंदा 2021 मध्ये ते बीएच्या अखेरच्या वर्षाची परीक्षा देत आहेत. आमदार फूलसिंह यांना 5 मुली असून 4 मुलीं ग्रॅज्यूएट आहेत. तर, एक मुलगी पुण्यातून लॉ चे शिक्षण घेत आहे.