नोटाबंदीचा परिणाम तिरुपती बालाजीच्या दानपेटीवर
By admin | Published: February 18, 2017 11:28 AM2017-02-18T11:28:07+5:302017-02-18T11:28:07+5:30
नोटाबंदीचा परिणाम तिरुपती बालाजी मंदिरालादेखील बसला असून भक्तांच्या खिशाला बसलेल्या झटक्याचा परिणाम दानपेटीत दिसत आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
तिरुमाला, दि. 18 - नोटाबंदीचा परिणाम तिरुपती बालाजी मंदिरालादेखील बसला असून भक्तांच्या खिशाला बसलेल्या झटक्याचा परिणाम दानपेटीत दिसत आहे. तिरुपती बालाजी मंदिराच्या उत्पन्नावर परिणाम झाला असल्याने ही आर्थिक कमतरता पुर्ण करण्याच्या हेतूने तिरुमला तिरुपति देवस्थानम ट्रस्टने भक्तांना देण्यात येणा-या प्रसाद आणि इतर सुविधांचा दर वाढवण्याचा विचार केला आहे. ट्रस्टने यासंबंधी राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. मात्र मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी हा प्रस्ताव नाकारला आहे.
नोटाबंदी निर्णय जाहीर होण्याआधी तिरुमला तिरुपति देवस्थानम ट्रस्टला दिवसाला पाच कोटींचं उत्पन्न मिळत होतं. यामध्ये बँक डिपॉजिटदेखील आहेत. मात्र नोटाबंदीनंतर उत्पन्न कमी झालं असून एक कोटींवर आलं आहे. ट्रस्टचे चेअरमन चाडलवडा कृष्णमूर्ती यांच्या म्हणण्यानुसार, 'आम्ही भक्तांवर अतिरिक्त भार टाकू इच्छित नाही. तरीही आम्ही मंदिरात दर्शनासाठी दिल्या जाणा-या तिकीट दरात थोडीशी वाढ करण्याचा विचार करत आहोत. यासाठी राज्य सरकारची संमती मिळणं गरजेचं आहे'.
मंदिरात दर्शनासाठी 50 रुपयांपासून ते पाच हजापर्यंत तिकीट उपलब्ध आहेत. यामध्ये भक्तांचा कल विशेष दर्शनासाठी मिळणा-या 300 रुपयांच्या तिकीटाकडे असतो. रोज कमीत कमी दोन हजार लोक 500 रुपयांचं तिकीट खरेदी करुन व्हीआयपी दर्शन घेतात. ट्रस्टला या तिकीट दरात पाच ते दहा रुपयांची वाढ करायची आहे. अशाप्रकारे उत्पन्नात आलेली कमतरता भरुन काढण्यात मदत होईल असं ट्रस्टचं म्हणणं आहे. ट्रस्टने हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे. मात्र मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी तो नाकारला आहे.