Coronavirus: “पुढील महिन्यापर्यंत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव; १५ मे नंतर जास्त धोकादायक”
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 11:28 AM2021-04-21T11:28:15+5:302021-04-21T11:28:30+5:30
सरकारने उद्योग उत्पादन क्षमतेला वाचवण्यासाठी अनेक उपाय केले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार नाही असं के वी सुब्रमण्यम म्हणाले.
नवी दिल्ली- देशात कोरोनामुळं परिस्थिती बिकट होत चालली आहे. कोरोनाची दुसरी लाट मे महिन्यातही कायम राहू शकते. मेच्या पहिल्या पंधरवड्यात याचा परिणाम खूप जाणवू शकतो असा इशारा मोदी सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार के. वी सुब्रमण्यम यांनी दिला आहे. देशात कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील २४ तासांत २ लाख ९५ हजाराहून अधिक रुग्ण समोर आले आहेत. तर २ हजारापेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत.
के. वी सुब्रमण्यम म्हणाले की, मी महामारीचा अभ्यासक नाही. मी फक्त यावर नजर ठेऊन आहे. मी एपिडेमियोलॉजिस्टचे अनेक पेपर वाचले आहेत. आयआयटी कानपूरने चांगल्या मॅथेमेटिकल मॉडलिंगच्या आधारे आयसीएमआरसारख्या संस्थांच्या रिसर्च आधारे मी सांगू शकतो की, भारतात कोरोनाची दुसरी लाट मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत असेल.
न्यूज एजेन्सी पीटीआयच्या नुसार, ग्रेट लेक्स इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटद्वारा आयोजित एका कार्यक्रमात के. वी सुब्रमण्यम बोलत होते. या संकटाचा परिणाम अर्थव्यवस्थेवर जास्त होणार नाही. कोविड १९ च्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव मे पर्यंत राहील असं इंडियन मेडिकल रिसर्चसारख्या अनेक संस्थांच्या रिपोर्टवर आधारित सांगतो. सरकारने उद्योग उत्पादन क्षमतेला वाचवण्यासाठी अनेक उपाय केले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार नाही असं के वी सुब्रमण्यम म्हणाले.
भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या १,५६,१६,१३० वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी (२१ एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत२,९५,०४१ नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दीड कोटीवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा एक लाख ८२ हजारांवर पोहोचला आहे. याच दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लसीकरण आणि कोरोना रुग्णांबाबत माहिती दिली आहे. देशात आतापर्यंत १२,७१, ००,००० हून अधिक जणांना कोरोनावरील लस दिली गेली आहे. मृत्यू दरही १.१८ टक्के इतका कमी झाला आहे.