‘गरिबांच्या योजना प्रभावीपणे राबवा’
By Admin | Published: August 28, 2016 12:37 AM2016-08-28T00:37:57+5:302016-08-28T00:37:57+5:30
केंद्र सरकारच्या वतीने गरिबांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांनी
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या वतीने गरिबांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांनी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केले.
भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व भाजपा प्रदेशाध्यक्षांची एक बैठक शनिवारी दिल्लीत झाली. बैठकीच्या उद्घाटन सत्रात शाह यांनी सांगितले की, सध्या भाजपा देशातील ५७ टक्के भूभागावर, तसेच ३७ टक्के लोकसंख्येवर राज्य करत आहे. मोदी सरकारकडून गरिबांसाठी सुमारे ८0 योजना राबविल्या जातात. त्यापैकी ६५ योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्य सरकारांवर आहे. अशा परिस्थितीत भाजपाशासित राज्यांची या कल्याणकारी योजनांच्या यशात महत्त्वाची भूमिका आहे.
मे २0१४ मध्ये केंद्रात भाजपाची सत्ता आली. त्यानंतर अशा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाह यांनी राज्य शाखांच्या कोअर समितीची बैठक घेतली. या बैठकीत ‘गरिबांचे हित आणि सुशासन’ या विषयीचा अजेंडा ठेवण्यात आला. सध्या भाजपा दलित आणि अल्पसंख्याक समुदायावरील अत्याचाराच्या घटनांमुळे विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आहे. अशा कठीण प्रसंगी कल्याणकारी योजना आणि गरिबांवर विशेष लक्ष दिल्यास राजकीय संकटातून वाचता येऊ शकेल, असे भाजपात मानले जात आहे.
शाह यांनी सांगितले की, भाजपाने देशात कामकाजाच्या राजकारणाचा नवा अध्याय सुरू केला आहे. भाजपाची राज्यांतील सरकारे केवळ आपल्या चांगल्या कामाच्या बळावर वारंवार निवडून आली आहेत. गरिबांसाठी कल्याणकारी राज्य बनविणे आणि सामान्य जनतेच्या जीवनात बदल घडवून आणणे, ही केंद्र आणि राज्य सरकारांची संयुक्त जबाबदारी आहे. (लोकमत न्यूज नेटकवर्क)
वसुंधरा राजे गैरहजर
या महत्त्वाच्या बैठकीला राजस्थानच्या
मुख्यमंत्री वसुंधरा राजे मात्र गैरहजर राहिल्या. त्यांनी स्वत: येण्याऐवजी ज्येष्ठ मंत्र्यांना
बैठकीला पाठविले होते. भाजपाशासित मुख्यमंत्र्यांची ही पहिली बैठक होती.