शेतमालाच्या निर्यातवाढीसाठी प्रयत्न
By admin | Published: November 11, 2016 04:28 AM2016-11-11T04:28:26+5:302016-11-11T04:28:26+5:30
भारतातल्या कृषी उत्पादनांसह विविध प्रकारच्या उत्पादनांना निर्यातीच्या माध्यमातून परदेशी बाजारपेठ प्राप्त व्हावी, यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्रालय अविरत प्रयत्न करीत आहे.
नवी दिल्ली : भारतातल्या कृषी उत्पादनांसह विविध प्रकारच्या उत्पादनांना निर्यातीच्या माध्यमातून परदेशी बाजारपेठ प्राप्त व्हावी, यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्रालय अविरत प्रयत्न करीत आहे. पारंपारिक वस्तूंबरोबरच आयुर्वेदिक औषधांचाही जगभर प्रसार व्हावा, यासाठी जगातल्या नव्या बाजारपेठा आम्ही शोधल्या आहेत. दक्षिण आफ्रिका, लॅटिन अमेरिका सारख्या देशांना भारतीय उत्पादनांकडे आकर्षित करण्यात आम्हाला यश आले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थविषयक संपादकांच्या परिषदेत केले.
सीतारामन म्हणाल्या, नाशिक व देशातील अन्य भागांतून द्राक्षांची निर्यात २५ वर्षांपासून सुरू आहे. निर्यात व्यवसायात येणाऱ्या अडचणींबाबत नाशिकचे द्राक्ष उत्पादक अलीकडेच मला भेटले. त्यांच्या समस्यांकडे माझे लक्ष आहे. द्राक्ष निर्यातदारांना अॅपेडाचे अधिकाधिक सहकार्य मिळावे, यासाठी मी सूचना दिल्या आहेत.
महाराष्ट्रातला साखर उद्योग सध्या संकटात आहे. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना साखर निर्यातीतूनच थोडी कमाई होते. या निर्यातीवर सध्या केंद्र सरकारने बंदी घातली आहे, ही बंदी उठवण्यासाठी शरद पवारांनी मध्यंतरी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. त्याबाबत विचारता सीतारामन म्हणाल्या की, देशी बाजारपेठेत साखरेचे भाव प्रमाणाबाहेर वाढू नयेत, यासाठी सरकारतर्फे काही वस्तूंच्या निर्यातीवर निर्बंध घातले जातात. मात्र ही बंदी दीर्घकाळासाठी नसते.
ग्राहकसंरक्षण मंत्रालयाची हरकत नसल्यास साखरेच्या निर्यातीला आमच्या मंत्रालयाची हरकत असण्याचे कारण नाही. आॅरगॅनिक साखर, खांडसरी इत्यादींच्या निर्यातीवर बंदी नाही. निर्यातदारांनी त्या पर्यायांचा विचार करायलाही हरकत नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)