विरोधी ऐक्याला तडा देण्यासाठी प्रयत्न; भाजप १५ नेत्यांना पाठविणार पाटण्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 10:15 AM2023-06-06T10:15:46+5:302023-06-06T10:16:37+5:30
ही बैठक यशस्वी होऊ नये यासाठी भाजपने १५ नेत्यांची टीम तयार ठेवली आहे.
संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाखाली पाटणा येथे १२ जूनला होणारी विरोधी पक्षांची बैठक तूर्तास टळली आहे. मात्र, ही बैठक यशस्वी होऊ नये यासाठी भाजपने १५ नेत्यांची टीम तयार ठेवली आहे.
जेव्हा ही बैठक होईल तेव्हा हे नेते पाटणा आणि परिसरात राहून बैठकीतील हवा काढून घेण्यासाठी प्रयत्न करतील. विरोधी पक्षांची बैठक सलग तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. आधी ही बैठक १९ मे रोजी होणार होती. नंतर ती मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार होती. त्यानंतर १२ जूनची तारीख निश्चित करण्यात आली होती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आदी नेत्यांशी बोलून बैठकीची नवी तारीख ठरविली जाईल.
१५ जणांमध्ये कोण?
माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह, केंद्रीय मंत्री नित्यानंद राय, माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह, माजी केंद्रीय मंत्री आणि लोक समता पक्षाचे नेते उपेंद्र कुशवाह, लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान, व्हीआयपीचे नेते मुकेश साहनी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांच्यासह १५ नेत्यांवर नितीशकुमार यांना घेरण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.