काँग्रेसमध्ये अहंकार शिरल्याने संवाद बंद झाला, राहुल गांधी यांची कबुली; नवी दृष्टी स्वीकारणे हाच तरणोपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 01:48 AM2017-09-13T01:48:19+5:302017-09-13T01:48:19+5:30
सलग दुस-यांदा सत्तेत आल्यानंतर ‘संपुआ-२’च्या २०११-१२च्या सुमारास काँग्रेसमध्ये एक प्रकारचा अहंकार निर्माण झाला आणि पक्षातील चर्चा-संवादाची परंपरा बंद पडली, अशी स्पष्ट कबुली काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली.
वॉशिंग्टन : सलग दुस-यांदा सत्तेत आल्यानंतर ‘संपुआ-२’च्या २०११-१२च्या सुमारास काँग्रेसमध्ये एक प्रकारचा अहंकार निर्माण झाला आणि पक्षातील चर्चा-संवादाची परंपरा बंद पडली, अशी स्पष्ट कबुली काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली.
बर्कले येथे कॅलिफोर्निया विद्यापीठात राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांपुढे भाषण केले आणि नंतर त्यांच्या अनेक प्रश्नांना मनमोकळी उत्तरेही दिली. काँग्रेसच्या सद्य:स्थितीवर भाष्य करताना राहुल म्हणाले की, काँग्रेस कोणा एकाच्या मर्जीनुसार चालत नाही. पक्षाची ध्येयधोरणे चर्चेतून संवादातून ठरतात. सन २००४मध्ये सत्तेवर येताना काँग्रेसने जे धोरण डोळ्यांपुढे ठेवले होते ते १० वर्षांचे होते व सन २०१२पर्यंत ते कालबाह्य ठरायला लागले.
राहुल गांधी म्हणाले की, सलग १० वर्षे सत्तेवर राहणाºया कोणत्याही राजकीय पक्षापुढे ही समस्या येणे स्वाभाविकही आहे. पण काँग्रेसच्या बाबतीत असे घडले की, ‘संपुआ-२’चे सरकार असताना सन २०१२च्या सुमारास काँग्रेसमध्ये अहंकार शिरून चर्चा-संवाद बंद झाला. हा चर्चा-संवाद पुन्हा सुरू करूनच काँग्रेसला नवसंजीवनी द्यावी लागेल, असे सांगून ते म्हणाले की, भारतात आज ३०-४० कोटी तरुणांची नवी पिढी मोठ्या आशा-आकांक्षा बाळगून आहे. या तरुणांना उज्ज्वल भविष्याची दृष्टी मिळेल, अशी ध्येयधोरणे आखण्याखेरीज एकट्या काँग्रेसलाच नव्हे, तर कोणत्याही राजकीय पक्षाला तरणोपाय नाही. भाजपाने काँग्रेसचीच अनेक धोरणे व योजना नव्याचा मुलामा चढवून स्वीकारली आहेत. पण ती फार काळ चालू शकणार नाहीत, हे मी काँग्रेसच्या अनुभवावरून सांगू शकतो, असेही ते म्हणाले.
सगळीकडेच घराणेशाही
काँग्रेसमधील घराणेशाहीबद्दल विचारलेल्या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, याबद्दल फक्त आम्हालाच दूषणे देऊ नका.
भारतात राजकारणातच नव्हे, तर इतरही अनेक क्षेत्रांत घराणेशाही चालत आलेली दिसते. बॉलिवूड व उद्योगक्षेत्रही याला अपवाद नाही. अनेक क्षेत्रांतील कित्येक बडी मंडळी मोठ्या घराण्यांचा वारसा घेऊनच आलेली दिसतात.
परंतु काँग्रेसमध्ये फक्त घराणेशाहीच चालते, हे मी मान्य करणार नाही. काँग्रेसमध्ये घराण्याचा वारसा नसलेलेही अनेक नेते आहेत. राज्याराज्यांत मी याची उदाहरणे दाखवू शकेन. त्यामुळे पक्षाचे काम करताना घराण्याहून ती व्यक्ती सक्षम असणे व संवेदनशील असणे महत्त्वाचे असते.
पक्षाध्यक्षपदासाठी..
पक्षाध्यक्ष या नात्याने काँग्रेस पक्षाची धुरा हाती घ्यायला तयार आहात का, या प्रश्नास राहुल गांधी यांनी सकारात्मक उत्तर दिले.
मात्र ते म्हणाले की, मी स्वत:च हे सांगणे बरोबर होणार नाही. कारण पक्षात अध्यक्ष निवडला जातो व पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यांनी असे बोलून दाखविले असले तरी त्यांच्याकडे लवकरच पक्षाध्यक्षपदाची सूत्रे येण्याची शक्यता आहे.