भारतातील गोरगरीब व अल्पवयीन मुलींशी कंत्राटी विवाह करणा-या रॅकेटमधील आठ अरब शेख अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 04:02 AM2017-09-21T04:02:20+5:302017-09-21T04:02:24+5:30
भारतातील गोरगरीब व अल्पवयीन मुलींशी ‘कंत्राटी विवाह’ करून उपभोगानंतर त्यांना वा-यावर सोडून देण्याच्या रॅकेट बुधवारी उद्ध्वस्त करताना हैदराबाद पोलिसांनी मुली निवडण्यासाठी शहरात मुक्काम ठोकलेल्या आठ अरब शेखना अटक केली.
हैदराबाद: भारतातील गोरगरीब व अल्पवयीन मुलींशी ‘कंत्राटी विवाह’ करून उपभोगानंतर त्यांना वा-यावर सोडून देण्याच्या रॅकेट बुधवारी उद्ध्वस्त करताना हैदराबाद पोलिसांनी मुली निवडण्यासाठी शहरात मुक्काम ठोकलेल्या आठ अरब शेखना अटक केली.
पोलीस आयुक्त एम. महेंद्र रेड्डी यांनी सांगितले की, शहराच्या फलकनुमा व चंद्रयानगुट्टा भागातील अनेक लॉज व गेस्ट हाऊसवर छापे टाकून या अरब नागरिकांना अटक करण्यात आली. यात ओमानचे पाच तर कतारचे तीन नागरिक आहेत. आपल्या विकृत लैंगिक सुखासाठी निष्पाप कोवळ््या मुलींचा बळी घेण्यासाठी आलेल्या या अरबांमध्ये दोघे ८० वर्षांचे असून ते काठी वॉकर घेतल्याशिवाय चालू शकत नाहीत. अटक केलेल्यांमधील एक अरब नागरिक तर अंध आहे.
ज्यांनी आपण ‘कंत्राटी विवाह’ करण्यासाठी आल्याचे कबूल केले त्यांना अटक केली गेली. याखेरीज लॉज व गेस्ट हाऊसमध्ये राहणाºया इतर अरबांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. या ‘विवाहेच्छु’ अरबांखेरीज प्रत्येकी ५० हजार रुपये घेऊन त्यांचे बनावट निकाह लावून देणारे मुंबईचे मुख्य काझी फरीद अहमद खान यांनाही पोलिसांनी अटक केली. गेल्या काही दिवसांत अरबांचे असे ‘निकाह’ लावलेल्या दोन स्थानिक काझींनाही जेरबंद केले.
पोलिसांनी लॉज व गेस्ट हाऊसवर धाडी टाकल्या, तेव्हा या अरबांच्या ‘निवडीसाठी’ आणलेल्या २० अल्पवयीन मुलीही तेथे होत्या. त्यांची पोलिसांनी सुटका केली. मंगळवारी सुरू झालेल्या धाडी बुधवारपर्यंत सुरु होत्या. हे अरब जेथे मुक्कामाला होते, त्या सर्व लॉज व गेस्ट हाऊसना सील ठोकण्यात आले. चंद्रयानगुट्टा भागातील एका गेस्ट हाऊसमध्ये तर ओमानच्या ७० वर्षाच्या अरबाशी १५ वर्षाच्या मुलीचा ‘निकाह’ लावणे सुरू असतानाच पोलीस पोहोचले.
अशाच प्रकारे ‘कंत्राटी’ विवाह केलेल्या ओमानच्या एका शेखला १८ आॅगस्ट रोजी अटक झाली होती. त्यानंतर पोलिसांनी हैदराबाद विमानतळावर येणाºया अरब नागरिकांवर नजर ठेवणे सुरू केले.
>दलाल, लॉजवालेही सामील
या रॅकेटमध्ये दलाल व लॉजवालेही सामील आहेत. शहरातील अशा ३५ दलालांचा पोलिसांनी छडा लावला आहे. या धाडीत त्यापैकी तिघांना अटक केली गेली. लग्नासाठी मुलगी उपलब्ध करून देणे, लॉजवर राहण्याची सोय करणे, निकाह लावून देणे अशा ‘पॅकेज’चे ते अरबांकडून १० ते ३० लाख रुपये घेतात, असे समजते. त्यापैकी फारच थोडी रक्कम मुलींच्या आई-वडिलांना दिली जाते.