रुग्णालयास लागलेल्या आगीत आठ कोरोना रुग्णांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 01:37 AM2020-08-07T01:37:30+5:302020-08-07T01:37:57+5:30
तेथे उपचार सुरू असलेल्या आणखी सुमारे ४० कोरोना रुग्णांना अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले
अहमदाबाद : अहमदाबाद शहराच्या नवरंगपुरा या गजबजलेल्या वस्तीत खासगी रुग्णालयास गुरुवारी पहाटे लागलेल्या आगीत तेथे उपचार सुरू असलेले आठ कोरोनाचे रुग्ण भाजून मृत्युमुखी पडले. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली. पोलीस व अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार नवरंगपुरामधील श्रेय हॉस्पिटल हे खासगी रुग्णालय सरकारने फक्त कोविड-१९ च्या रुग्णांसाठीचे केंद्र म्हणून घोषित केले होते. तेथे पहाटे ३.३० च्या सुमारास अचानक आग लागली. मृतांमध्ये पाच पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे.
तेथे उपचार सुरू असलेल्या आणखी सुमारे ४० कोरोना रुग्णांना अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले. मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी या दुर्घटनेमागचे नेमके कारण शोधण्यासाठी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमण्याचे जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. मृत रुग्णांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख व जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून देण्याचेही मोदींनी जाहीर केले.