उत्तराखंडात दरीत जीप कोसळून आठ ठार
By admin | Published: July 4, 2016 04:37 AM2016-07-04T04:37:16+5:302016-07-04T04:37:16+5:30
उत्तराखंडात पावसाचा कहर सुरूच असून, शनिवारी रात्री उशिरा रस्ता खचल्याने झालेल्या एका अपघातात जीप दरीत कोसळून आठ जण ठार झाले
डेहराडून : उत्तराखंडात पावसाचा कहर सुरूच असून, शनिवारी रात्री उशिरा रस्ता खचल्याने झालेल्या एका अपघातात जीप दरीत कोसळून आठ जण ठार झाले आहेत, तर नऊ जण जखमी झाले.
डेहराडूनजवळच्या चकराता शहरानजीक हा अपघात झाला. उत्तराखंडात गत चार-पाच दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. शनिवारी रात्री ही जीप प्रवाशांना घेऊन जात असताना अचानक रस्ता खचल्याने जीप थेट दरीत कोसळली. यात आठ जण मृत्युमुखी पडले. आतापर्यंत या पावसाने २९ जणांचे बळी घेतले आहेत, तर मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या वाढू शकते, अशी भीतीही व्यक्त होत आहे.
अनेक भागांत पावसाने हाहाकार उडालेला असताना आगामी ३६ तासांत जोरदार पाऊस कोसळू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. (वृत्तसंस्था)
भिंत कोसळून एक ठार
मथुरा : उत्तर प्रदेशात मथुरा येथे रविवारी दुपारी पावसाने एक भिंत पडून यात एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, तर अन्य तीन जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका घराची भिंत कोसळून नसरुद्दीन यांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.