दोस्तीला सॅल्यूट! परीक्षेची तयार सोडून जखमी स्वीटीच्या उपचारासाठी 8 मित्रांनी जमा केले 40 लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 03:08 PM2023-01-13T15:08:28+5:302023-01-13T15:08:56+5:30
Sweety Accident Case : आर्थिक परिस्थितीमुळे स्वीटीचे उपचार थांबू दिले नाहीत. स्वीटीच्या 8 मित्रांनी परीक्षेची तयारी सोडून पैसे गोळा करण्याची मोहीम सुरू केली.
रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेली बीटेक विद्यार्थिनी स्वीटीच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. याचे श्रेय डॉक्टरांव्यतिरिक्त स्वीटीच्या 8 मित्रांनाही जाते. स्वीटीला वाचवण्यासाठी तिच्या इंजिनीअरिंग करणाऱ्या मित्रांनी दिवसरात्र एक केली. आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी स्वीटीचे उपचार थांबू दिले नाहीत. स्वीटीच्या 8 मित्रांनी परीक्षेची तयारी सोडून पैसे गोळा करण्याची मोहीम सुरू केली. सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून मदतीचे आवाहन केले. अपघातानंतर 10 दिवसांत त्यांनी स्वीटीच्या उपचारासाठी 40 लाख रुपये जमा केले. पोलीस विभागाने स्वीटीच्या उपचारासाठी सुमारे 10 लाख रुपये दिल्याचे सांगण्यात येत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीटेक फायनल इयरची विद्यार्थिनी स्वीटी आता शुद्धीवर आली आहे. तिला आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे. 31 डिसेंबर रोजी रात्री 9 च्या सुमारास ग्रेटर नोएडामध्ये स्वीटी एका रोड अपघाताची शिकार झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, स्वीटी रस्त्याच्या कडेला पायी जात होती. तेव्हा एका कारने तिला धडक दिली. यानंतर, स्वीटीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक दिवस ती मृत्यूशी झुंज देत आहे.
स्वीटीच्या उपचारासाठी क्राउड फंडिंग
पोलीस खाते स्वीटीच्या मदतीसाठी पुढे आले आहे. ग्रेटर नोएडाच्या डीसीपींनी घोषणा केली की नोएडा पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस स्वीटीच्या उपचारासाठी त्यांचा एक दिवसाचा पगार देतील. याशिवाय स्वीटीच्या मित्रांनीही विविध माध्यमातून आवाहन करून पैसे गोळा केले आणि आता स्वीटीच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
स्वीटीच्या डोक्याला गंभीर दुखापत
अपघातात गंभीर जखमी झालेली स्वीटी ग्रेटर नोएडा येथील जीएनआयओटी कॉलेजमध्ये शिकते. ती बीटेकच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी आहे. या अपघातात स्वीटीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडाच्या बीटा-2 सेक्टरमध्ये स्वीटीला एका कारने धडक दिली, जेव्हा ती तिच्या दोन मैत्रिणींसोबत रस्त्याच्या कडेला चालली होती. या अपघातात स्वीटीच्या दोन मैत्रिणींनाही किरकोळ दुखापत झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"