आठ रुग्णालयांनी नकार दिला; उपचाराअभावी गर्भवतीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 04:52 AM2020-06-08T04:52:57+5:302020-06-08T04:53:06+5:30
नोएडातील धक्कादायक घटना; प्रशासनाकडून चौकशी सुरू
नॉयडा : आठ महिन्यांची गरोदर असलेल्या व उच्च रक्तदाबामुळे श्वसनास त्रास होत असलेल्या एका ३० वर्षीय महिलेला नोएडामधील तब्बल आठ रुग्णालयांनी बेड रिकामे नसल्याचे कारण देऊन दाखल करून घेतले नाही. वेळीच उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप या महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश गौतम बुद्धनगर जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
या मृत महिलेचे नाव नीलम असून ती गाझियाबाद येथील खोरा गावची रहिवासी होती. तिच्या मागे पती व पाच वर्षांचा एक मुलगा असा परिवार आहे. नीलमचा भाऊ शैलेंद्रकुमार याने सांगितले की, प्रकृती चिंताजनक बनलेल्या नीलमला रिक्षात घालून आम्ही शुक्रवारी किमान सहा रुग्णालयांत गेलो. पण सर्वच ठिकाणी तिला दाखल करून घेण्यास नकारघंटा वाजविण्यात आली. त्यानंतर नीलमला आॅक्सिजनची गरज असल्याने एका रुग्णवाहिकेत घालून आणखी दोन रुग्णालयांत नेण्यात आले. तिथेही तिला दाखल करून घेण्यात आले नाही. एकही बेड रिकामा नाही, असे कारण रुग्णालयांतून नीलमच्या नातेवाईकांना ेसांगितले. नीलमला आम्ही अगदी थोडावेळ दाखल करून घेतले. तिला व्हेंटिलेटरवर ठेवून नंतर दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला, असे शारदा हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.
असंवेदनशीलतेचा कळस
च्नीलमला सरतेशेवटी नॉयडाच्या गव्हर्मेन्ट इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस (जीआयएमएस) रुग्णालयात नेले असता, तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिला काही रुग्णालयांनी दाखल करून घेण्यास नकार देणे हा असंवेदनशीलतेचा कळस आहे, अशी प्रतिक्रिया आता या घटनेवर उमटत आहे. नीलमवर गाझियाबादमधील शिवालिक रुग्णालयात त्याआधी पाच दिवस उपचार करण्यात आले होते. त्यानंतर तिला ४ जून रोजी घरी जाऊ देण्यात आले. शुक्रवारी तिची प्रकृती पुन्हा बिघडली होती.