काँग्रेसचे राजीव सातव यांच्यासह राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांचे निलंबन
By ravalnath.patil | Published: September 21, 2020 10:18 AM2020-09-21T10:18:24+5:302020-09-21T11:06:10+5:30
गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांतील आठ खासदारांना संसदेच्या उर्वरित अधिवेशनापर्यंत निलंबित केले आहे.
नवी दिल्ली : राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांना निलंबन करण्यात आले आहे. राज्यसभेत कृषी विधेयके रविवारी मांडली जात असताना निर्माण करण्यात आलेल्या गोंधळामुळे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी ही खासदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांतील आठ खासदारांना संसदेच्या उर्वरित अधिवेशनापर्यंत निलंबित केले आहे. यामध्ये खासदार डेरेक ओ’ ब्रिएन, संजय सिंह, रिपुन बोरा, नजीर हुसैन, केके रागेश, ए करीम, राजीव सातव आणि डोला सेन यांचा समावेश आहे.
Derek O Brien, Sanjay Singh, Raju Satav, KK Ragesh, Ripun Bora, Dola Sen, Syed Nazir Hussain and Elamaran Karim suspended for one week for unruly behaviour with the Chair: Rajya Sabha Chairman M Venkaiah Naidu pic.twitter.com/JUs9pjOXNu
— ANI (@ANI) September 21, 2020
दरम्यान, राज्यसभेत कृषी विधेयके रविवारी मांडली जात असताना निर्माण करण्यात आलेल्या गोंधळामुळे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू हे कमालीचे नाराज झाले होते. गदारोळ करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी म्हटले होते. याप्रकरणी नायडू यांनी त्यांच्या निवासस्थानी उपसभापती हरिवंश, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह उच्च पातळीवरील बैठक घेतली होती.
विरोधी पक्षांनी दोन (शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुलभीकरण) विधेयक, २०२० आणि शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) करार किंमत आश्वासन आणि कृषी सेवा विधेयक, २०२०) विधेयकांचा निषेध केला. ही विधेयके सभागृहात मांडण्यात आली. यावेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ’ ब्रिएन, काँग्रेसचे खासदार रिपूण बोरा, आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह आणि द्रमुकचे खासदार तिरुची सिवा हे उपसभापती हरिवंश यांचा माईक हिसकावून घेण्याचा प्रयत्न करताना दिसले. अनेक खासदारांनी हरिवंश यांच्याविरोधात घोषणाही दिल्या व कागद फाडले. या गोंधळात कामकाज दहा मिनिटांसाठी थांबले होते.
१२ विरोधी पक्षांचा उपसभापतींवर अविश्वास प्रस्ताव
राज्यसभेत रविवारी झालेल्या कामकाजावर प्रचंड संतप्त झालेल्या १२ विरोधी पक्षांनी उपसभापती हरिवंश यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल केला. वरिष्ठ सभागृहात ज्या पद्धतीने रविवारी २ कृषी विधेयके मंजूर करण्यात आली, त्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. ज्या पक्षांनी हा प्रस्ताव दाखल केला आहे, त्यात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, तेलंगणा राष्ट्रीय समिती, माकपा, भाकपा, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, नॅशनल कॉन्फरन्स, द्रमुक व आम आदमी पार्टी यांचा समावेश आहे. आजच्या प्रकाराने लोकशाहीचा खून झाला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी दिली. उपसभापतींनी लोकसभेची सर्व मूल्ये पायदळी तुडवली आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
आणखी बातम्या...
- काँग्रेसचे राजीव सातव यांच्यासह राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांचे निलंबन
- योगी सरकारने लाँच केले 'कोविड अॅप', लॉग इन केल्यानंतर मिळणार कोरोना रिपोर्ट
- India Chine Faceoff : एलएसीवर तणाव सुरूच, दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांची आज बैठक
- आजचे राशीभविष्य - २१ सप्टेंबर २०२० - वृश्चिकसाठी लाभाचा अन् मकरसाठी आनंदाचा दिवस