बादली अपवित्र केली म्हणून आठ महिन्यांच्या गर्भवती दलित महिलेला अमानुष मारहाण, पोटातल्या बाळासह महिलेचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 12:16 PM2017-10-27T12:16:34+5:302017-10-27T12:29:14+5:30
घरातील बादलीला चुकून स्पर्श केला म्हणून एका गर्भवती दलित महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
लखनऊ - ठाकूरांच्या घरातील बादलीला चुकून स्पर्श केला म्हणून एका गर्भवती दलित महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत महिलेचा आणि तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर जिल्ह्यातील खेतालपूर भानसोली गावात 15 ऑक्टोंबरला ही घटना घडली. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार सावित्री देवी असे मृत महिलेचे नाव असून ती आठ महिन्यांची गर्भवती होती.
15 ऑक्टोंबरला सकाळी नऊ वाजता नेहमीप्रमाणे सावित्री देवी गावातील कचरा गोळा करण्याठी गेली. एका ठाकूरच्या घरातून कचरा उचलत असताना अचानक एक रिक्षा तिथे येऊन थांबली. या रिक्षामुळे सावित्रीला तोल सावरता आला नाही व तिने तिथे ठेवलेल्या बादलीला स्पर्श केला. सावित्रीने बादलीला स्पर्श केल्याचे पाहताच त्या घरातील महिला अंजूला संताप अनावर झाला. अंजून सावित्रीच्या पोटात बुक्के मारले आणि तिचे डोके धरुन भिंतीवर आपटले.
तू स्पर्श करुन आमची बादली अपवित्र केलीस असे अंजू मारहाण करताना बोलत होती. त्यानंतर अंजूचा मुलगा रोहित तिथे आला व त्याने सुद्धा काठिने सावित्री देवीला मारले असे कुसूम देवीने सांगितले. कुसूम सावित्रीची शेजारी आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सावित्रीचा आणि तिच्या पोटातील बाळाचा सहादिवसांनी मृत्यू झाला. डोक्याला मार लागल्यामुळे सावित्रीचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे.
सावित्रीला मारहाण झाली त्यादिवशी तिची नऊ वर्षांची मुलगी तिच्यासोबत होती. आईला मारहाण सुरु झाल्यानंतर तिने लगेच मदतीसाठी तिच्या वस्तीकडे धाव घेतली. ज्यावेळी मी आणि अन्य महिला तिथे पोहोचलो त्यावेळी अंजू आणि तिचा मुलगा सावित्रीला मारहाण करत होता. आम्ही मध्येपडून सावित्रीची सुटका केली असे कुसूम देवीने सांगितले. सावित्रीला गावातील पाच घरांचा कचरा उचलण्याचे महिन्याला 100 रुपये मिळायचे.
मारहाण झाली त्याचदिवशी मी सावित्रीला घेऊन जिल्हा रुग्णालयात गेलो. पण बाहेरुन कुठलीही जखम नसल्यामुळे ती पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे सांगून डॉक्टरांनी तिला परत घरी पाठवून दिले. घरी आल्यानंतर सावित्री सतत डोक आणि पोटात दुखत असल्याची तक्रार करत होती असे सावित्रीचे पती दिलीप कुमार यांनी सांगितले.