कन्हैयासह आठ जणांचे निलंबन रद्द
By admin | Published: March 13, 2016 04:01 AM2016-03-13T04:01:41+5:302016-03-13T04:01:41+5:30
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या प्रशासनाने देशद्रोहाच्या आरोपात अडकलेला विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैयाकुमार, उमर खालीद आणि अनिर्बन यांच्यासह आठ विद्यार्थ्यांचे निलंबन मागे घेतले आहे
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या प्रशासनाने देशद्रोहाच्या आरोपात अडकलेला विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैयाकुमार, उमर खालीद आणि अनिर्बन यांच्यासह आठ विद्यार्थ्यांचे निलंबन मागे घेतले आहे, त्यामुळे हे विद्यार्थी पुन्हा आपल्या वर्गांमध्ये परतू शकणार आहेत.
गेल्या ९ फेब्रुवारीला विद्यापीठ परिसरात आयोजित कथित राष्ट्रविरोधी कार्यक्रमानंतर या आठ विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर चौकशीसाठी स्थापित उच्चस्तरीय समितीने आपला तपास पूर्ण केल्यावर हे निलंबन रद्द करण्याचा निर्णय झाला. चौकशी सुरू असल्याने विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले होते. आता चौकशी संपल्याने ते पुन्हा वर्गात जाऊ शकतात; परंतु याचा अर्थ त्यांना क्लीन चिट देण्यात आली असा नाही. प्रशासनातर्फे समितीच्या शिफारशींचे अध्ययन केल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या शिक्षेबाबत निर्णय घेतला जाईल, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले. अफजल गुरूच्या फाशीविरुद्ध कार्यक्रमाच्या आयोजनानंतर ही चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)