आठ बंडखोर आमदारांचा राजीनामा
By admin | Published: February 22, 2016 03:41 AM2016-02-22T03:41:11+5:302016-02-22T03:41:11+5:30
तामिळनाडू विधानसभेतील डीएमडीकेच्या आठ बंडखोर आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचे राजीनामे दिले. हे आठही आमदार आता सत्तारूढ अण्णाद्रमुकमध्ये सामील होणार आहेत.
चेन्नई : तामिळनाडू विधानसभेतील डीएमडीकेच्या आठ बंडखोर आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचे राजीनामे दिले. हे आठही आमदार आता सत्तारूढ अण्णाद्रमुकमध्ये सामील होणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या राजकीय घडामोडीमुळे विजयकांत यांना आपले विरोधी पक्षनेतेपद गमवावे लागले आहे. या आठ आमदारांनी विधानसभा अध्यक्ष पी. धनपाल यांच्याकडे राजीनामे सादर केले.
आणि अध्यक्षांनी हे राजीनामे तात्काळ मंजूर केले. विजयकांत यांच्या डीएमडीकेचे २८ आमदार होते. आठ आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे ही संख्या २० वर आली आहे आणि विजयकांत यांना विरोधी पक्षनेतेपदही गमवावे लागले आहे.
विधानसभेच्या नियमानुसार आता डीएमडीकेचे संस्थापक विजयकांत हे विरोधी पक्षनेतेपदासाठी पात्र असणार नाहीत. तसेच विधानसभेत कोणत्याही विरोधी पक्षाकडे २४ आमदार नसल्याने आता सभागृहात मान्यताप्राप्त विरोधी पक्षनेता असणार नाही, असे विधानसभा अध्यक्षांच्या सचिवालयाने म्हटले आहे. २३४ सदस्यीय विधानसभेत द्रमुकजवळ २३ आमदार आहेत.
सी. अरुण पांडियन, एम. अरुम सुब्रह्मण्यम, के. पांडियाराजन, के. तामिळ अझगन, एस. मिशेल रायप्पन, आर. सुंदरराजन, टी. सुरेश कुमार व आर. संथी अशी डीएमडीकेच्या आमदारांची नावे आहेत. (वृत्तसंस्था)