मुंबईत वॉटर टॅक्सीसाठी आठ मार्ग निश्चित; चाकरमान्यांचा होणार पर्यावरणपूरक व परवडणारा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 01:15 AM2020-08-27T01:15:51+5:302020-08-27T07:09:36+5:30

जहाजबांधणी मंत्रालयाची योजना, केटा मरनची क्षमता ५० प्रवासी

Eight routes for water taxis fixed in Mumbai; environmentally friendly and affordable | मुंबईत वॉटर टॅक्सीसाठी आठ मार्ग निश्चित; चाकरमान्यांचा होणार पर्यावरणपूरक व परवडणारा प्रवास

मुंबईत वॉटर टॅक्सीसाठी आठ मार्ग निश्चित; चाकरमान्यांचा होणार पर्यावरणपूरक व परवडणारा प्रवास

Next

टेकचंद सोनवणे 

नवी दिल्ली : मुंबईवरील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी जहाज बांधणी मंत्रालयाने दिलासा देणाऱ्या प्रयोगाची तयारी सुरू केली आहे. मुंबईतील उपनगरांना सागरी मार्गाने जोडून छोट्या जहाजांमधून प्रवासी वाहतूक करण्यासाठी आठ मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. प्रायोगिक तत्त्वावर या मार्गांवरून वेगवेगळ्या भागात जाणारे छोटे जहाज (वॉटर टॅक्सी) चालवले जाईल. वॉटर टॅक्सी प्रकल्पासाठी ही ठिकाणे जहाजबांधणी मंत्रालयाने निश्चित केली आहेत.

संकल्पना अशी आहे
सागरी मार्गाचा दैनंदिन स्थानिक वाहतुकीसाठी फारसा वापर केला जात नाही. लोकलच मुंबईची जीवनवाहिनी आहे. आता मात्र लोकल कोरोनामुळे ठप्प झाली. लांबचा विचार करता सागरी मार्ग पर्याय ठरू शकेल म्हणून आर्थिकदृष्ट्या सोयीचे व पर्यावरणास बाधा न आणणारे दळणवळणाचे माध्यम म्हणून वॉटर टॅक्सीकडे पाहिले जाते.

असा असेल प्रवास
केटा मरन, केबिन फेरी व पॅसेंजर क्राफ्ट अशा तीन प्रकारच्या वॉटर टॅक्सीतून प्रवासी वाहतूक केली जाईल. केटा मरनची क्षमता ५० प्रवासी तर इतर दोन्ही वॉटर टॅक्सीतून एका वेळी प्रत्येकी १४ जण प्रवास करू शकतील. सुरुवातीला पर्यटनवाढीचा विचार मात्र व्यावहारिक ठरल्यास नियमित प्रवासी वाहतूक सुरू केली जाईल. प्रयोगिक तत्त्वावर सकाळी साडेआठ, दुपारी दोन व सायंकाळी सात वाजता वॉटर टॅक्सी धावेल. दोन ठिकाणांमध्ये प्रवासासाठी किती वेळ लागतो, यावर या योजनेचे यश-अपयश ठरेल, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली. केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी अलीकडेच या प्रकल्पासाठी दिवसभराची बैठकही घेतली.

असे आहेत ८ मार्ग

  1. ठाणे-दिवा-डोंबिवली-कल्याण
  2. ऐरोली-कोपरखैरणे-वाशी-नेरळ
  3. गेटवे-आयसीटी-डीसीटी- नेरळ
  4. गेटवे-वरळी- वांद्रे-जुहू
  5. जुहू-वर्सोवा-मालाड-बोरीवली
  6. बोरीवली-मीरा भाईंदर-वसई-विरार
  7. नेरळ-जेएनपीटी-कारंजे -रेवास आवरे -धरमतार
  8. विरार-वसई-मीरा भाईंदर-कोलशेत -पूर्व ठाणे


या मार्गांवर बोटीसाठी थांबे असतील. उदाहरणार्थ विरार ते ठाणे या मार्गावर विरारहून अर्नाला जेटी-वसई पाचू जेटी-मीरा भाईंदर जेटी-कावेसर/ पाटीलपाडा/ कासारवाडा कोलशेत-ठाणे पूर्व कळवा पारसिक बंदर असे थांबे असतील. असेच थांबे प्रत्येक मार्गावर निश्चित करण्यात आले आहेत.

Web Title: Eight routes for water taxis fixed in Mumbai; environmentally friendly and affordable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.