आठवी नापास 'पप्पू' वाटत होता BTech, MBBS आणि MBA च्या डिग्री
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 11:23 AM2018-01-30T11:23:35+5:302018-01-30T11:23:56+5:30
देशभरातील नावाजलेल्या शैक्षणिक संस्थांच्या बनावट वेबसाइट्स तयार करुन त्याद्वारे लोकांकडून पैसे लाटत त्यांना बोगस डिग्री आणि सर्टिफिकेट वाटणा-या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे
नवी दिल्ली - देशभरातील नावाजलेल्या शैक्षणिक संस्थांच्या बनावट वेबसाइट्स तयार करुन त्याद्वारे लोकांकडून पैसे लाटत त्यांना बोगस डिग्री आणि सर्टिफिकेट वाटणा-या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हे लोक दहावी आणि बारावीशिवाय बीएड, बीटेक, जेबीटी, एलएलबी, एमबीबीएस, आयटीआय, एमबीएसारख्या अनेक कोर्सेसच्या बनावट डिग्री आणि मार्कशीट करायचे. धक्कादायक म्हणजे या टोळीतील तिघांपैकी एकजण बारावी पास तर दुसरा आठवी नापास आहे. पोलिसांना यांच्याकडे बनावट मार्कशीट्स, प्रमाणपत्रं, 20 लाख रुपये, दोन फोन, एक संगणक आणि एक प्रिंटर सापडला आहे.
डीसीपी (पश्चिम विभाग) विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची ओळख हरीनगरचा रहिवासी पंकज अरोरा (35), जालंधरचा राहणारा पविंदर सिंह उर्फ सोनू (40) आणि लुधियानाचा राहणारा कृष्ण उर्फ पाली (40) अशी झाली आहे. पदवीधर असलेल्या पंकजने हरीनगरमध्ये एसआरकेएम एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर सोसायटीच्या नावे एक संस्थान सुरु केलं होतं, जेथून लोकांना बनावट प्रमाणपत्रं दिली जात होती. आठवी नापास गोपाल बोगस मार्कशीट्स आणि डिग्री प्रिंट करुन लोकांना उपलब्ध करुन देत होता. सोनू याआधी दिल्ली पोलिसांनी एकदा फसणवणीच्या आरोपाखाली अटक केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील सिकर येथे राहणारे विजय कुमार यांनी हरीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यांनी तक्रारीत सांगितलं होतं की, 'एक स्थानिक वृत्तपत्रात एसआरकेएम एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर सोसायटीची जाहिरात पाहिल्यानंतर दहावी पास करण्यासाठी संचालक पंकजशी संपर्क साधला. या लोकांनी विजय कुमार आणि त्यांच्या सात मित्रांना एका चांगल्या संस्थेत प्रवेश मिळवून देण्याच्या बदली एक लाख रुपये घेतले होते.' काही दिवसानंतर विजय यांना पोस्टातून आंध्रप्रदेशच्या सेकंडरी एज्युकेशन बोर्डाची दहावाची मार्कशीट, मायग्रेशन सर्टिफिकेट आणि ट्रान्सफर सर्टिफिकेट मिळाले. जेव्हा विजय यांनी पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्ज केला, तेव्हा आपलं मार्कशीट बनावट असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
विजय यांनी केलेल्या तक्रारीच्या आधार पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली. तपास केला असता या टोळीने आतापर्यंत अनेकांना असे बोगस सर्टिफिकेट, मार्कशीट दिलं असल्याचं समोर आलं.