योगी यांच्या मंत्रिमंडळातील ८५ % मंत्री किमान पदवीधर, ५२ मंत्री पीएचडी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 05:48 AM2022-03-27T05:48:21+5:302022-03-27T05:49:48+5:30
५२ मंत्री पीएचडी, २ डॉक्टर, १ इंजिनीअर, ६ वकील, २२ पोस्ट ग्रॅज्युएट, ११ ग्रॅज्युएट
शरद गुप्ता
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील ८५ टक्के मंत्री पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत. यात विद्यापीठातील शिक्षक, माजी आयएएस-आयपीएस, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे वकील यांचा समावेश आहे. योगी मंत्रिमळात स्वत: मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्यासह ११ मंत्री पदवीधर आहेत. पंतप्रधान मोदी यांचे सचिव राहिलेले जितीन प्रसाद आणि उत्तराखंडच्या माजी राज्यपाल बेबी राणी मौर्य यांच्यासह २२ जण पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. ९ प्रोफेशनल आणि ३ पीएचडी आहेत.
मंत्रिमंडळातील बरेलीचे आमदार डॉ. अरुण कुमार हे एमबीबीएस आहेत. हाथरसचे धर्मवीर प्रजापती आयुर्वेदाचे डॉक्टर आहेत. शाहजहानपूरचे जेपीएस राठौड इंजिनिअर आहेत. उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक, वरिष्ठ मंत्री सुरेश खन्ना यांच्यासह ६ मंत्री वकील आहेत. पीएचडी असलेल्या मंत्र्यांत मेरठ दक्षिणचे डॉ. सोमेंद्र सिंह तोमर, आग्राच्या एत्मादपूरचे डॉ. धर्मपाल सिंह आणि वाराणसीचे डॉ. दयाशंकर मिश्र दयालू यांचा समावेश आहे. दयालू हे एका कॉलेजात प्रिन्सिपलही आहेत.
१५ टक्के मंत्री नाहीत पदवीधर
योगी यांच्या मंत्रिमंडळातील १५ टक्के मंत्री हे केवळ बारावी अथवा त्यापेक्षाही कमी शिकलेले आहेत. यात तीन जण बारावी पास आहेत. दोन जण दहावी पास, तर दोनजण केवळ आठवी पास आहेत. मेहरौनीचे आमदार मनोहर लाल, अलाहाबाद दक्षिणचे आमदार नंद गोपाल गुप्ता नंदी आणि भूपेंद्र सिंह चौधरी हे बारावी पास आहेत. बागपतमधील बडोतचे आमदार कृष्णपाल मलिक आणि आग्राच्या खैरचे आमदार अनूप वाल्मिकी हे दहावी पास आहेत.
हस्तिनापूरमधून जिंकलेले दिनेश आणि सीतापूरचे राकेश राठौड हे आठवी पास आहेत. राकेश राठौड हे तर एकेकाळी स्कूटरचे पंक्चर काढण्याचा व्यवसाय करीत असत.
माजी आयएएस अन् आयपीएस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सचिव राहिलेले माजी आयएएस अधिकारी अरविंदकुमार शर्मा यांना मंत्री बनविण्यात आले आहे. कानपूरचे पोलीस आयुक्त राहिलेले आयपीएस अधिकारी असीम अरुण यांनाही मंत्रिपद मिळाले आहे.