एकतर 'ते किंवा आपण', इस्त्राइलचं फक्त उदाहरण नको तसं करुन दाखवा

By परब दिनानाथ | Published: February 19, 2018 11:41 AM2018-02-19T11:41:10+5:302018-02-19T12:22:39+5:30

फक्त सर्जिकल स्ट्राईकने प्रश्न सुटणार नसेल तर आपल्याला सैन्य कारवाईची व्याप्ती वाढवावी लागेल.  लाहोर, कराचीपर्यंत भारताच्या कारवाईचे तडाखे जाणवले पाहिजेत त्याचवेळी पाकिस्तानला शहाणपण येईल. 

Either 'it or you', show Israel as just an example | एकतर 'ते किंवा आपण', इस्त्राइलचं फक्त उदाहरण नको तसं करुन दाखवा

एकतर 'ते किंवा आपण', इस्त्राइलचं फक्त उदाहरण नको तसं करुन दाखवा

googlenewsNext
ठळक मुद्देआज आपल्या जवानांचा हकनाक बळी जात असताना आपण आपली आयुधे वापरणार नसू तर या खरेदीचा काय उपयोग? लाहोर, कराचीपर्यंत भारताच्या कारवाईचे तडाखे जाणवले पाहिजेत त्याचवेळी पाकिस्तानला शहाणपण येईल.

शरीरात एखाद्या ठिकाणी गाठ झाल्यानंतर डॉक्टर शक्य असल्यास इंजेक्शन देऊन ती गाठ विरघळवण्याचा प्रयत्न करतात. पण इंजेक्शनची मात्रा लागू झाली नाही, तर शस्त्रक्रिया करावी लागते. सध्या सीमेवर जी परिस्थिती आहे ती लक्षात घेतली तर भारतालाही पाकिस्तानवर अशाच प्रकारची शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. दोनवर्षांपूर्वी उरी येथील लष्करी तळावर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांच्या हल्ल्यात आपले 18 जवान शहीद झाले. त्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईककरुन अतिरेक्यांचे तळ उद्धवस्त केले. पाकिस्तानवर जरब बसावी, पाकिस्तानने भारतात दहशतवादी पाठवण्यापूर्वी दहावेळा तरी विचार करावा असा त्यामागे हेतू होता. 

पण आजची स्थिती बघितली तरी बिलकुल याउलट घडले आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांचे हल्ले कमी होण्याऐवजी वाढले आहेत. त्यात रोजच्या रोज हकनाक आपले जवान शहीद होत आहेत. भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषा, आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून होणा-या गोळीबाराला फक्त शस्त्रसंधी उल्लंघन म्हणता येणार नाही. सीमेवरील गावच्या गाव रिकामी केली आहेत. तिथे राहणा-या लोकांसाठी विशेष बंकर बांधण्यात येत आहेत. हे सर्व तेव्हाच होते जेव्हा युद्ध सुरु होते. त्यामुळे नियंत्रण रेषेवर सध्या जे काही सुरु आहे ते युद्धच आहे. 

फरक इतकाच आहे कि, अजूनही हे युद्ध मर्यादीत स्वरुपात सुरु आहे. 2014 साली केंद्रात मनमोहन सिंग सरकार जाऊन नरेंद्र मोदींचे सरकार आले. त्यावेळी नियंत्रण रेषेवरील आपल्या धोरणात अमुलाग्र बदल झाला. पाकिस्तानच्या प्रत्येक आगळीकीला आपण चोख उत्तर देण्यास सुरुवात केली. पाकिस्तानने एक बॉम्बगोळा टाकला तर आपण दहा बॉम्ब गोळयांनी उत्तर देऊ लागला. खरतंर नियंत्रण रेषेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताने अशी धडक कारवाई सुरु केली. पण अजून तरी पाकिस्तानला शहाणपणे आलेले नाही, त्यांची कुरापतखोरी बंद झालेली नाही. उलट ती वाढली आहे. ज्याची किंमत आपल्या जवानांना त्यांच्या कुटुंबियांना चुकवावी लागत आहे. 

आपण या लढाईत कुठे बॅकफुटवर पडलो आहोत अस नाहीय. आपणही पाकिस्तानला पुरुन उरत आहोत. आपल्यापेक्षा तीन ते चारपट जास्त नुकसान पाकिस्तानचे झालेय. जानेवारीपासून आतापर्यंत पाकिस्तानचे 20 पेक्षा जास्त सैनिक ठार झाले आहेत. पण आपलेही जवान शहीद झालेत हे सुद्धा विसरुन चालणार नाही. फक्त सर्जिकल स्ट्राईकने प्रश्न सुटणार नसेल तर आपल्याला सैन्य कारवाईची व्याप्ती वाढवावी लागेल.  लाहोर, कराचीपर्यंत भारताच्या कारवाईचे तडाखे जाणवले पाहिजेत त्याचवेळी पाकिस्तानला शहाणपण येईल. 

पाकिस्तानबरोबर झालेल्या तीन युद्धांपेक्षा दहशतवादी हल्ल्यांमध्ये आपले जास्त जवान मारले गेले आहेत. कितीकाळ आपण या दहशतवादी हल्ल्याच्या भितीच्या सावटाखाली जगायचे ? आणि आपल्याला जवानांनी देशासाठी बलिदान द्यायचे. कुठेतरी हे थांबले पाहिजे. आज आपल्याकडे सुखोई-30 सारखे अत्याधुनिक फायटर विमान आहे. लवकरच आपण रशियाकडून एस-400 मिसाइल सिस्टिम, फ्रान्सकडून राफेल फायटर विमान खरेदी करणार आहोत. हजारो कोटी रुपये मोजून आपण जी शस्त्रास्त्रे विकत घेणार आहोत ती आपण वापरणारच नसू, तर इतके हजारो कोटी रुपये खर्च करण्याचा काय उपयोग? 

अमेरिकेकडे आज F-22 हे रडारला न सापडणारे जगातील सर्वाधिक प्रगत फायटर विमान आहे. फ्रान्सकडे राफेल आहे. दोन्ही देशांनी सीरिया आणि लिबियामधील युद्धात आपल्या या शस्त्रांचा वापर केला. आज आपल्या जवानांचा हकनाक बळी जात असताना आपण आपली आयुधे वापरणार नसू तर या खरेदीचा काय उपयोग? आपण सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय लष्कराची इस्त्रायल बरोबर तुलना करुन स्वत:ची पाठ थोपटून घेतली होती. पण इस्त्रायलने 1967 साली एकाचवेळी आठ देशांबरोबर युद्ध केले होते आणि जिंकलेही होते. आपण आज एकाचवेळी चीन आणि पाकिस्तान दोन्ही आघाडयांवर लढू शकतो का ? तितकी आपली तयारी आहे का ? 

1976 साली जेव्हा पॅलेस्टाइनच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलचे प्रवासी असलेले एअर फ्रान्सच्या विमानाचे अपहरण केले. त्यावेळी इस्त्रायलने चार हजार किलोमीटरचे अंतर कापून युगांडामध्ये घुसून कमांडो कारवाई केली आणि आपल्या नागरिकांची सुटका केली. इस्त्रायलने संपूर्ण जगाला थक्क करुन सोडणारा पराक्रम गाजवला होता. भारतात तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात बिलकुल याउलट घडले होते. राष्ट्रप्रेम, राष्ट्रवाद आवश्यक आहे पण स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी काश्मीरचा विषय जिवंत ठेऊन त्यावर भावनिकतेला साद घातली जात असेल, तर ते धोकादायक आहे. सीमेवरचा तणाव संपवायचा असेल तर पूर्ण ताकदीनिशी पाकिस्तानवर प्रहार करा, अन्यथा त्यांच्याशी चर्चा करा. ज्यावेळी एक सैनिक शहीद होतो तेव्हा आपला ऊर राष्ट्रप्रेमाने भरुन येतो. आपल्या मनात काहीकाळ ती भावना राहते आणि नंतर आपण विसरुन जातो. पण ज्या कुटुंबाने आपला वयात आलेला कर्ता मुलगा गमावला त्याचे दु:ख त्यांना आयुष्यभर सलत रहाते.                                                                 
 

Web Title: Either 'it or you', show Israel as just an example

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.