मनसेच्या उमेदवारांचे ‘एकला चलो रे’
By admin | Published: February 15, 2017 05:30 PM2017-02-15T17:30:10+5:302017-02-15T17:30:10+5:30
राज यांच्या सभेवर ठरणार भवितव्य
नाशिक : शिवसेना-भाजपाकडून दुय्यम फळीतील नेत्यांच्या जाहीर सभांना सुरुवात झालेली असताना सत्ताधारी असलेल्या मनसेला मात्र नेत्यांची चणचण भासत आहे. मनसेचे बव्हंशी नेते मुंबई - ठाणे महापालिका निवडणुकीत अडकल्याने नाशिकच्या उमेदवारांना एकट्यानेच इंजिन ओढावे लागत आहे. दरम्यान, येत्या शुक्रवारी (दि.१७) होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेवरच मनसेच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असून, राज नेमके काय बोलतात, याचीही नाशिककरांना उत्सुकता लागलेली आहे.
महापालिकेत गेल्या पाच वर्षांत सत्ता उपभोगणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यंदा ९७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. चिन्ह वाटपानंतर गेल्या आठ दिवसांत मनसेच्या एकाही नेत्याची जाहीर सभा अथवा चौक सभा झालेल्या नाहीत. मनसेच्या ‘राजगड’ पक्ष कार्यालयात अद्यापही शांतताच असून, पक्षाचे उमेदवार मात्र आपापल्या स्तरावर प्रचार करताना दिसून येत आहे. बव्हंशी उमेदवारांनी मनसेची निशाणी असलेल्या ‘इंजिन’ची प्रतिकृती तयार केली आहे. त्यावर ‘आपल्या राजाला साथ द्या, मनसेला मत द्या’ हे गीत वाजविले जात आहे. तूर्त तरी मनसेच्या उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठींवर भर दिलेला आहे. पक्षाचे संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर तळ ठोकून असले तरी त्यांचीही दमछाक होताना दिसून येत आहे. मनसेचे स्टार प्रचारक माजी आमदार बाळा नांदगावकर, रश्मी ठाकरे, नितीन सरदेसाई यांच्या जाहीर सभा विभागनिहाय होणार असल्याचे सांगितले जात होते, परंतु हे स्टार प्रचारक मुंबई, ठाणे, पुणे या महापालिकांमध्येच अडकून पडले आहेत. त्यामुळे नेतेमंडळी उपलब्ध होणे स्थानिक मनसेला अवघड होऊन बसले. मनसेने एलईडी व्हॅनमार्फत आजवर केलेल्या कामांचा प्रचार करण्याची मोहीम आखली असली तरी अद्यापही त्या रस्त्यावर आलेल्या नाहीत. त्यामुळे उमेदवार आपापल्या स्तरावरच प्रचारपत्रके तयार करत घरोघर फिरताना दिसून येत आहेत. मनसेचे शहराध्यक्ष व प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले यांचेही नाव स्टार प्रचारकांच्या यादीत आहे. परंतु, ढिकले हे सुद्धा त्यांच्या प्रभागातील पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी अडकून पडले आहेत. यंदा कोणतीही लाट नसली तरी आहे ते अस्तित्व टिकवून ठेवण्याचे आव्हान मनसेपुढे आहे. मागील निवडणुकीत मनसेच्या पारड्यात २८.२३ टक्के मते पडली होती. यंदा त्यात भर पडते की घट होते, हे २३ फेबु्रवारीला निकालाच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.