रात्रीस खेळ चाले! एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदार गुवाहाटीला रवाना; रातोरात खास विमानाने एअरलिफ्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 03:20 AM2022-06-22T03:20:23+5:302022-06-22T03:22:05+5:30
दिवसभराच्या नाट्यमय घडामोडींनंतर आता एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य सर्व आमदारांना मध्यरात्री विशेष विमानाने गुवाहाटी येथे रवाना करण्यात आले आहे.
मुंबई: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि ठाण्यातील शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारले. त्यांच्यासोबत ३० पेक्षा जास्त आमदार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये अपक्षही आमदार आहेत. शिंदे यांनी आपल्यासोबत यापैकी काही आमदारांना नेले आहेच, तसेच ठाण्यातील खास पदाधिकारीही सूरतला गेले असल्याचे सांगितले जात आहे. काही व्हिडिओतून या बंडखोर आमदारांसोबत भाजप नेते मोहित कंबोज यांच्यासह संजय कुटे हेदेखील असल्याचे दिसत आहे. यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना आता सूरतहून गुवाहाटीला एका खास विमानाने नेले आहे.
महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारपासून राजकीय हालचाली तीव्र होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सत्ता स्थापनेचा दावा केल्यास एकनाथ शिंदे गटातील आमदारांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात आहे. तशी घडामोड घडल्यास सूरत महाराष्ट्रापासून अगदी जवळ असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी भाजप खबरदारी घेत असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. आताच्या घडीला एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेसह अपक्ष ३३ आमदार असल्याचे सांगितले जात आहे. तर, दुसरीकडे माझ्या पाठिशी ३५ नाही ४० आमदारांचे समर्थन असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मंगळवारी रात्री काही बसेस या आमदारांना विमानतळावर घेऊन जाण्यासाठी सूरतमधील हॉटेलमध्ये दाखल झाल्या. यातून या आमदारांसह त्यांच्यासोबत असलेल्या सर्वांना रात्री २.१५ वाजता विमानतळावर नेण्यात आले आणि तिथून खास विमानांनी गुवाहाटीला हे सर्व जण रवाना झाले.
दिवसभर अनेक नाट्यमय घडामोडी
विधान परिषदेचा निकाल लागताच एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसोबत थेट सूरत गाठले. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीच्या बातमीनंतर शिवसेनेच्या गोटात खळबळ माजली. शिवसेनेच्या एकेका आमदारांना संपर्क साधून वर्षा बंगल्यावर येण्याच्या सूचना देण्यात आल्या. शिवसेनेचे खासदार, आमदार, पदाधिकारी यांची मोठी बैठक पार पडली. यानंतर मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक यांना एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी सूरतला पाठवण्यात आले. शिवसेनेचे दोन्ही नेते एकनाथ शिंदे यांना भेटले. त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून बोलून आपले म्हणणे अगदी स्पष्टपणे मांडले.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय चर्चा झाली?
तुम्ही तुमचे ठरवा, मी माझे ठरवतो. एकीकडे चर्चा, दुसरीकडे अपहरणाचा आरोप, तिसरीकडे गटनेटेपदावरून काढले असे का केले? या संवादात एकनाथ शिंदे म्हणाले की, मी कुठलाही गट अथवा पक्ष स्थापन केलेला नाही. कुठेही मुख्यमंत्रिपदाबाबत बोललो नाही मग गटनेते पदावर काढले का? संजय राऊत माझ्याशी फोनवर चांगले बोलतात आणि वारंवार प्रसारमाध्यमांसमोर माझ्याविरोधात बोलतात. भूमिका मांडायची मग मुंबईत या असे बोलत आहेत. मग प्रसारमाध्यमांमध्ये वेगळे का बोलतायेत असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला.