Eknath Shinde Ayodhya : 'त्यांनी सत्तेसाठी वडिलांना दिलेलं वचन मोडलं', अयोध्येतून CM एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 05:03 PM2023-04-09T17:03:02+5:302023-04-09T17:06:06+5:30
Eknath Shinde Ayodhya : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत रामललाचे दर्शन घेतले.
Eknath Shinde Ayodhya : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज रामललाचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते. यानंतर पत्रकार परिषद घेऊन शिंदेंनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर सडकून टीका केली. भाजप आणि शिवसेनेची विचारधारा एकच असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, सर्व कार्यकर्ते 2 दिवसांपासून अयोध्येत उपस्थित आहेत, त्यांचे आभार. राममंदिर ही आपली श्रद्धा आहे. 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बाळासाहेब ठाकरे आणि करोडो भक्तांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
'काही लोकांना हिंदुत्वाची अॅलर्जी आहे'
शिंदे पुढे म्हणाले की, अयोध्येचा विकास वेगाने होत आहे. हजारो लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटणार आहे. काँग्रेसवर ताशेरे ओढत ते म्हणाले की, काही लोक आहेत, ज्यांना वेदनाही होत आहेत. त्यांना हिंदुत्वाची अॅलर्जी आहे. स्वातंत्र्यानंतर काही लोक हिंदुत्वाबद्दल गैरसमज पसरवत होते, ते आजही करत आहेत. आमचे हिंदुत्व सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे. हिंदुत्वामुळे राजकीय दुकाने बंद होतील, असे अनेकांना वाटते. मंदिर बांधणार पण तारीख सांगणार नाही, असे बोलणाऱ्या लोकांना पीएम मोदींनी मंदिर बांधून उत्तर दिले, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
#WATCH | UP: Some are not happy with our Ayodhya Yatra. Some are allergic to Hindutva... Shiv Sena and BJP have the same ideology... Nobody did anything for the Ram Mandir only PM Modi did...He has fulfilled Balasaheb Thackeray's dream of Ram Mandir. Uddhav Thackeray went against… pic.twitter.com/C3z9QBXdfU
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 9, 2023
'आम्ही जनतेच्या निकालाचे पालन केले'
ते पुढे म्हणाले की, अभिमानाने बोला आपण हिंदू आहोत, हा नारा बाळासाहेब ठाकरे यांनी दिला होता. शिवसेना आणि भाजपची विचारसरणी एकच आहे. जाणीवपूर्वक दिशाभूल करणारे मतभेद पसरवले गेले. 2019 मध्ये भाजपने शिवसेनेसोबत सरकार स्थापन करावे, अशी जनतेची इच्छा होती. सत्तेच्या लालसेपोटी त्यांची दिशाभूल झाली, पण आम्ही 8 महिन्यांपूर्वी जनतेचा निर्णय योग्य ठरवला. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात होते असे सरकार आम्ही स्थापन केले. ही विचारधारा पुढे नेण्याण्यासाठी आम्ही अयोध्येत आलो आहोत.
उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला
उद्धव ठाकरेंवर टीका करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, वडिलांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी प्रभू श्री रामाने 14 वर्षे वनवास भोगला. दुसरीकडे ज्या मुलाने जनता आणि आपल्या वडिलांना शब्द दिला होता, सत्तेसाठी तो शब्द मोडला. गेल्या 8-9 महिन्यांत जे निर्णय झाले, ते अनेक वर्षात घेतले गेले नाहीत. आमचे सरकार सर्वसामान्यांचे, कामगारांचे, विद्यार्थी, महिलांचे, गरीबांचे सरकार आहे. मी घरी बसणारा नाही तर शेतात काम करणारा मुख्यमंत्री आहे. आदेश देऊन एसीत बसणारा मी नाही, तर मी एक कार्यकर्ता आहे आणि जमिनीशी जोडलेला मुख्यमंत्री आहे. बाळासाहेबांनी कारसेवेत चांदीचे आसन मांडले होते, तेव्हापासून अयोध्येशी शिवसैनिकांचे नाते आहे. आमची अयोध्येवर श्रद्धा आहे, म्हणूनच आज आम्ही येथे आहोत, असेही ते म्हणाले