शिंदे-फडणवीस यांची अमित शाह यांच्यासोबत चर्चा; दिल्लीत रात्रीच्या बैठका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 07:42 AM2023-06-05T07:42:25+5:302023-06-05T07:43:32+5:30
अमित शाह कोचीहून रात्री सव्वा दहा वाजता दिल्लीत पोहोचले. तोपर्यंत मुख्यमंत्री शिंदे पुण्याहून तर उपमुख्यमंत्री फडणवीस नागपूरहून दिल्लीत दाखल झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : राज्यातील भाजप-शिवसेना सरकारला एक वर्ष पूर्ण होत असताना राज्य मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी रात्री दिल्लीत दाखल झाले. उशिरा रात्रीपर्यंत अमित शाह यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू होती.
अमित शाह कोचीहून रात्री सव्वा दहा वाजता दिल्लीत पोहोचले. तोपर्यंत मुख्यमंत्री शिंदे पुण्याहून तर उपमुख्यमंत्री फडणवीस नागपूरहून दिल्लीत दाखल झाले होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी अल्पकाळ थांबून मुख्यमंत्र्यांनी शाह यांचे निवासस्थान गाठले. तोपर्यंत फडणवीसही तिथे पोहोचले होते.
या बैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलताना शाह यांच्यासोबत होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराच्या चर्चेविषयी मुख्यमंत्र्यांनी बोलण्याचे टाळले. मंत्रिमंडळात सध्या भाजपचे १० आणि शिंदे गटाचे १० मंत्री आहेत. मात्र, विस्तारात भाजपला जास्त मंत्रिपदे हवी आहेत अशी चर्चा आहे. त्यामुळेच अमित शाह यांच्याशी चर्चा करून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पुढील निर्णय या चर्चेत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.