उद्धव ठाकरेंचं काय चुकलं; थेट नाव न घेता पुन्हा ऐकवलं, उपाध्यक्षांना नवं पत्र पाठवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 12:53 AM2022-06-24T00:53:44+5:302022-06-24T00:54:30+5:30
एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीवरून एक नवे पत्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पाठवलेय. नेमके काय म्हटलेय यात? वाचा
गुवाहाटी: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारसाठी हा एक मोठा झटका होता. मात्र, लगेचच शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पावले उचलण्यात आली. शिवसेनेच्या गटनेते पदावरून एकनाथ शिंदे यांची उचलबांगडी करत अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, यावर एकनाथ शिंदे यांनी आक्षेप घेतला. तसेच आपणच गटनेता असल्याचे सांगत भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती करत असल्याचे सांगितले. तशा आशयाचे नवीन पत्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पाठवण्यात आले आहे. त्यावर ३७ आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शिवसेना घटकपक्षाची बैठक पार पाडून सदर बैठकीत पक्षाच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची तर मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची निवड केल्याचे सर्वानुमते निश्चित करण्यात आले आहे. या पत्रावर शिवसेनेच्या ३७ आमदारांची स्वाक्षरी असून या पत्राची प्रत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि विधानपरिषदेचे सचिव यांना पाठवण्यात आलेली आहे. बंडखोर आमदार एकमताने एकनाथ शिंदे यांना गटनेता घोषित केल्याचा एक व्हिडिओही जारी करण्यात आला. यापूर्वीही एकनाथ शिंदे यांनी उपाध्यक्ष असलेल्या नरहरी झिरवळ यांना पत्र पाठवले होते. मात्र, त्यावर ३२ आमदारांच्या सह्या होत्या. मात्र, आता २३ जून रोजी पाठवलेल्या पत्रात ३७ आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलेय नव्या पत्रात?
- शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयाच्या लेटरहेडवर हे पत्र काढण्यात आले असून, यात एकनाथ शिंदे गटनेते आणि भरत गोगावले प्रतोद असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भातील प्रस्ताव विश्वनाथ भोईर आणि शांताराम मोरे यांनी मांडला असून, ३७ आमदारांना त्याला अनुमोदन देत स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
- भारतीय जनता पक्षासोबत २०१९ च्या निवडणुका लढवल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी आघाडी करून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्याचे शिवसेना आमदारांना अजिबात पटलेले नव्हते.
- पोलीस भरती प्रकरणी राष्ट्रवादी नेते अनिल देशमुख आणि दाऊदशी संबंध असल्याच्या आरोप आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांच्यावर गुन्हे दाखल झाले. यावरून शिवसेनेवरही जनता नाराज झाली आणि टीका सोसावी लागली.
- महाविकास आघाडीमुळे राजकीय दृष्ट्या शिवसेना नेत्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. एवढेच नव्हे तर स्थानिक कार्यकर्त्यांचा रोषही वेळोवेळी ओढावून घ्यावा लागला.
- शिवसेनेने आपल्या विचार, धोरणांच्या विपरीत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांची हातमिळवणी करून सरकार स्थापन केले. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दबावामुळे मराठी माणसासाठी लढणाऱ्या शिवसेनेला अनेकदा आपल्या विचारांच्या विरोधात जाऊन भूमिका घ्यावी लागली.
- गेल्या अडीच वर्षांपासून महाविकास आघाडीत सामील झाल्यामुळे अन्य घटक पक्षांचे विचार न पटूनही अनेकदा शिवसेना पक्षाने आणि पक्ष नेतृत्वाने आपली तत्त्वे बाजूला ठेवून निर्णय घेतले.
- शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आपली हिंदुत्वाचा विचार आणि तत्वांशी तडजोड न करता, पारदर्शी, प्रामाणिक आणि निष्कलंक सरकार असावे, अशी भूमिका होती. मात्र, महाविकास आघाडी स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून याला तिलांजली मिळाल्याचे दिसून आले.
- राज्यातील जनतेने भाजप आणि शिवसेनेला डोळ्यासमोर ठेवून २०१९ मध्ये मतदान केले होते. जनतेचे आशीर्वाद भाजप आणि शिवसेनेच्या युतीला होते. मात्र, याविरोधी भूमिका घेतल्याचा प्रचंड मोठा फटका पक्षाला बसला.
- यासंदर्भात अनेकदा पक्षनेतृत्वाशी चर्चा केली. यातून बाहेर पडण्याचा आग्रह धरला. अक्षरशः डोळ्यात पाणी आणून विनवण्या केला. मात्र, पक्षातील नेते, पदाधिकारी यांच्या भावनांना जाणीवपूर्वक बगल देण्यात आली.
- गेल्या अडीच वर्षापासून घडत असलेल्या अनेक गोष्टींमुळे स्थानिक कार्यकर्ते आणि मतदारांचा पक्षावर दबाव निर्माण झाला आहे. आमदारांना अनेक समस्या, त्रासांना सामोरे जावे लागत आहे. आजही महाविकास आघाडी स्थापन केल्याबद्दल प्रश्नांचा भडिमार नेत्यांवर केला जात आहे.
- शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रखर राष्ट्रवादी नेते होते. त्यांचे हिंदुत्व, विचार घेऊन आता आम्ही पुढे जाण्याचे ठरवले आहे. काही भ्रष्टाचारी नेत्यांमुळे शिवसेनेलाही टीकचे धनी केले जात आहे. यापूर्वी देण्यात आलेल्या पत्रावर ३२ आमदारांच्या स्वाक्षऱ्या होत्या. मात्र, तो प्रस्ताव दुरुस्त करून नव्याने तयार करण्यात आला आहे.