शिंदे-ठाकरे वादात बृजभूषण सिंह यांची उडी; शिवसेना अन् उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 03:37 PM2022-06-29T15:37:54+5:302022-06-29T15:38:37+5:30
भाजपाच्या पाठित खंजीर खुपसून काँग्रेसचा हात तुम्ही पकडला. आमच्या कार्यकर्त्यांची साथ घेतली आणि सत्तेसाठी तुम्ही कुठे गेला? असा सवाल बृजभूषण सिंह यांनी उद्धव ठाकरेंना विचारलं आहे.
मुंबई - मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचं चित्र आहे. शिवसेनेचे तब्बल ३९ आमदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सहभागी झाले आहेत. गेल्या १० दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तानाट्याची देशभरात चर्चा आहे. आधी सूरत आणि नंतर गुवाहाटीला गेलेल्या तब्बल ५१ आमदारांनी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारला धोक्यात आणलं आहे.
या सर्व राजकीय घडामोडीत मनसैनिकांना चोपण्याची भाषा करणारे, राज ठाकरेंना उंदीर म्हणणारे मनसेच्या अयोध्या दौऱ्यात मिठाचा खडा टाकणारे आता हेच बृजभूषण पुन्हा एकदा मैदानात आलेत, बृजभूषण सिंह यांनी ठाकरे-शिंदे वादात उडी घेत थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. जाहीर व्यासपीठावरून बृजभूषण सिंह यांनी उद्धव ठाकरेंना भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसल्याची आठवण करून देत आहेत.
बृजभूषण सिंह म्हणाले की, शिवसैनिक तोडफोड करत आहेत. पक्षाच्या नावावर लढून गेला म्हणून बंडखोरीचा अधिकार नाही असं शिंदे गटाला सांगतायेत. जेव्हा एकनाथ शिंदे यांनी तुमच्याशी बंडखोरी केली तर दु:ख होत आहे. परंतु भाजपासोबत मिळून निवडणूक लढवली. छोटा भाऊ म्हणून निवडणूक लढवली. जागा जास्त लढवल्या. भाजपाच्या पाठित खंजीर खुपसून काँग्रेसचा हात तुम्ही पकडला. आमच्या कार्यकर्त्यांची साथ घेतली आणि सत्तेसाठी तुम्ही कुठे गेला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच बाळासाहेब ठाकरेंचा जो नारा होता त्याच्याविरोधात गेले. जे भाजपासोबत उद्धव ठाकरेंनी केले तेच शिवसैनिक त्यांच्यासोबत करत आहेत. बृजभूषण सिंह यांच्याशी पंगा घेतला आणि ठाकरे कुटुंबाचं अस्तित्व संपत आले आहे. लवकरात लवकर पंतप्रधान मोदी यांच्याकडे शरण या अन्यथा अस्तित्व उरणार नाही असा इशाराही बृजभूषण सिंह यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
संजय राऊतांनी केले होते कौतुक
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केल्यामुळे बृजभूषण सिंह चांगलेच चर्चेत आले होते. त्यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी बृजभूषण यांचं कौतुक करताना म्हटलं होतं की, बृजभूषण शरण सिंह हे त्यांची भूमिका मांडत आहेत. बृजभूषण सिंह यांना मी अनेक वर्ष ओळखतो. तो माणूस लढवय्या आहे. त्यांचे महाराष्ट्राशी संबंध फार जुने आहेत. आम्ही त्यांना नेताजी म्हणतो. ते स्वत: पैलवान आहेत. अनेक कुस्तीगीर त्यांनी निर्माण केले. आम्ही एकत्र काम केले आहे तो माणूस मागे हटणार नाही असं वाटतं अशा शब्दात राऊतांनी त्यांचे कौतुक केले होते.