PM मोदींचा सल्ला शिंदेसेनेच्या नेत्यानं ऐकला; परिवहन मंत्री गुजरातला पोहचले, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 10:34 IST2025-02-18T10:29:12+5:302025-02-18T10:34:21+5:30
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि अधिकाऱ्यांनी गुजरातमधील अहमदाबाद व वडोदरा येथील बसपोर्टची पाहणी केली.

PM मोदींचा सल्ला शिंदेसेनेच्या नेत्यानं ऐकला; परिवहन मंत्री गुजरातला पोहचले, कारण...
गांधीनगर - गुजरातच्या गांधीनगर येथील बसस्थानक शहरातील मध्यवर्ती ठिकाण आहे. या मोक्याच्या ठिकाणी व्यापाराच्या उद्देशाने गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसस्थानक परिसरात व्यावसायिक वापरासाठी व्यापारी संकुल उभारले. यातून येणाऱ्या महसूलातून प्रवाशांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधा असलेले बसपोर्ट तयार करण्यात आले. त्यामुळे व्यापार आणि प्रवासी दळणवळणाचा हा सुंदर मिलाफ असल्याचं कौतुक महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
गुजरात दौऱ्यावर गेलेले प्रताप सरनाईक यांनी गांधीनगर बसपोर्टची पाहणी केली. यावेळी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अधिकाही त्यांच्यासोबत होते. या दौऱ्यात गुजराचे परिवहन मंत्री हर्ष संघवी यांच्यासोबत मंत्री प्रताप सरनाईक यांची बैठक झाली. गुजरातच्या परिवहन अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील प्रकल्पांची माहिती सरनाईक यांना दिली. गुजरात परिवहन महामंडळ मार्फत चालवण्यात येणारी एकात्मिक नियंत्रण प्रणाली (Command Control System) अत्यंत चांगली असून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्येही अशा प्रकारची सुविधा असणे गरजेचे आहे असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं.
🗓 १७ फेब्रुवारी २०२५ | 📍गुजरात
— Pratap Baburao Sarnaik (@PratapSarnaik) February 17, 2025
• महाराष्ट्रातील एस.टी. परिवहन सेवेची गुणवत्ता आणि सुविधा सुधारण्यासाठी गुजरात दौऱ्यावर आलो असून, वडोदरा येथील एस.टी. बस आगाराला भेट दिली.
या भेटीदरम्यान तिकीट घर, स्वच्छतागृह, चालक-कर्मचारी विश्रामगृह आणि बसमधील अत्याधुनिक सुविधांचा आढावा… pic.twitter.com/2rhxmJmkPr
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि अधिकाऱ्यांनी गुजरातमधील अहमदाबाद व वडोदरा येथील बसपोर्टची पाहणी केली. यावेळी बसस्थानकावरील वेगवेगळ्या सोयी-सुविधा कशाप्रकारे प्रवाशांना दिल्या जातात, याबद्दलची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिली. विशेष करून तेथील प्रशासनाने बसस्थानकावर तात्पुरत्या विश्रांतीसाठी थांबणाऱ्या प्रवाशांना 'प्रवासी विश्रांतीगृह' कमी किंमतीमध्ये बस स्थानकावर उपलब्ध करून दिले आहेत. त्याचीही पाहणी करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'तो' सल्ला ऐकला...
अलीकडेच महायुतीच्या आमदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करत म्हटलं होते की, इतर राज्यात ज्या चांगल्या गोष्टी घडत आहेत, त्यांना भेट देऊन त्या आपल्या राज्यात कशा अंमलात आणता येतील याचा अभ्यास करावा. जेणेकरून विविध ठिकाणच्या नाविन्यपूर्ण योजना आपल्या राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होतील असं त्यांनी सांगितले. मोदींचा हा सल्ला मनावर घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांसह गुजरात गाठले. तेथील गुजरात राज्य मार्ग परिवहन सेवेमार्फत चालवल्या जाणाऱ्या बसपोर्ट प्रकल्पाची माहिती घेणे, त्यांच्या प्रादेशिक परिवहन व्यवस्थापनाचा अभ्यास करणे, त्याबरोबर त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी राबवत असलेल्या प्रोत्साहन योजना जाणून घेण्यासाठी या दौऱ्याची आखणी केली. इतर राज्यातील परिवहन सेवांचा अभ्यास करून त्यांच्या चांगल्या कल्पना आपल्या एसटी महामंडळामध्ये राबवणे शक्य आहे का याची देखील चाचपणी मंत्री सरनाईक करत आहेत.