घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 11:04 AM2024-11-26T11:04:12+5:302024-11-26T11:04:56+5:30
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या आजी-माजी खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितल्याची माहिती आहे.
Eknath Shinde ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी मुख्यमंत्रिपदाबाबतचा तिढा अद्याप कायम आहे. त्यातच राज्यात आता भाजपचाच मुख्यमंत्री होईल, अशी भूमिका भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मांडल्याने विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात अस्वस्थता असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या आजी-माजी खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितल्याची माहिती आहे.
शिवसेनेचे आजी-माजी खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत ते मोदींकडे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनाच संधी द्यावी, अशी विनंती करू शकतात. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाबाबत आपलं नाव मागे पडताच एकनाथ शिंदे यांच्याकडून थेट दिल्लीत दबावतंत्राचा अवलंब केला जात आहे का, अशाही चर्चांना आता उधाण आलं आहे.
दरम्यान, शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मंगळवारी दिल्लीला येणार असून शाह यांची भेट घेणार असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर नक्की कोण विराजमान होणार, याबाबतची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
एकनाथ शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज दिला आहे. शिंदे यांनी म्हटलं आहे की, "महायुतीच्या प्रचंड विजयानंतर राज्यात पुन्हा एकदा आपले सरकार स्थापन होणार आहे. महायुती म्हणून आपण एकत्रित निवडणूक लढवली आणि आजही एकत्रच आहोत. माझ्यावरील प्रेमापोटी काही मंडळींनी सर्वांना एकत्र जमण्याचे, मुंबईत येण्याचे आवाहन केले आहे. तुमच्या या प्रेमासाठी मी अत्यंत मनापासून ऋणी आहे. मात्र अशा पद्धतीने माझ्या समर्थनार्थ कुणीही एकत्र येऊ नये, असे आवाहन मी करतो. पुन्हा एकदा माझी नम्र विनंती की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आहे आणि यापुढेही भक्कमच राहील", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.