एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर; 'ऑपरेशन टायगर' की अन्य कोणते कारण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 12:07 IST2025-02-08T12:06:27+5:302025-02-08T12:07:24+5:30
उपमुख्यमंत्री शिंदे आज भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या भेटीगाठी घेणार असल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर; 'ऑपरेशन टायगर' की अन्य कोणते कारण?
Shiv Sena Eknath Shinde: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल रात्री दिल्लीला रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर राबवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा रंगत असतानाच शिंदे दिल्लीत दाखल झाल्याने तर्क-वितर्क लढवले जात आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे आज भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या भेटीगाठी घेणार असल्याचीही माहिती आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही खासदार आमच्या संपर्कात असून आगामी काळात त्यांचा पक्षप्रवेश होईल, असा दावा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या काही नेत्यांकडून केला जात होता. या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांनी काल नवी दिल्लीत एकत्रित पत्रकार परिषद घेत चर्चेचं खंडन केलं. मात्र तरीही पक्षांतराची चर्चा कायम असून एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाल्याने या चर्चेला आणखीनच बळ मिळालं आहे.
राज्यातील कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली भेटीचं आणखी एक कारण सांगितलं जात आहे. राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होऊन काही महिने लोटल्यानंतरही रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाही. शिंदेसेनेच्या नाराजीनंतर दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री निवडीला स्थगिती देण्याची नामुष्की मुख्यमंत्र्यांवर ओढावली होती. परंतु अद्यापही याबाबतचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे भाजप नेतृत्वासोबतच्या भेटीत याबाबतही चर्चा करण्याची शक्यता आहे.