Eknath Shinde: "४० आमदारांचा पाठिंबा, माझ्याकडचा गट हीच खरी शिवसेना", एकनाथ शिंदेंचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 07:36 AM2022-06-22T07:36:40+5:302022-06-22T07:45:32+5:30
Eknath Shinde: आपल्याकडे ४० आमदारांचा पाठिंबा आहे. तसेच माझ्याकडा गट हीच खरी शिवसेना आहे, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
गुवाहाटी - एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडी सरकारला जबरदस्त हादरा बसला आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांना शिवसेना गटनेते पदावरून हटवून सेना नेतृत्वाने डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गुजरातमधील सूरत येथून आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचलेल्या एकनाथ शिंदे यांनी सकाळी सकाळी शिवसेनेमध्ये भूकंप घडवणारा दावा केला आहे. आपल्याकडे ४० आमदारांचा पाठिंबा आहे. तसेच माझ्याकडा गट हीच खरी शिवसेना आहे, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
आसाममधील गुवाहाटी विमानतळावर उतरल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व पुढे घेऊन जाणार आहोत. आमच्यासोबत ४० आमदार आहेत. तसेच आणखी १० आमदारांचा आम्हाला पाठिंबा मिळणार आहे, असा दावा एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच आपल्याकडे शिवसेनेचे दोन तृतियांश आमदार असून, आमचा गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
दरम्यान, आज दुपारी एकनाथ शिंदे हे विशेष विमानाने मुंबईत येणार असून, ते राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता आहे. तसेच राज्यपालांकडे ते आपला गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा ते करतील, असा दावा करण्यात येत आहे.
हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे इतर शिवसेना आमदार गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. पहाटे तीनच्या सुमारास गुजरातमधील सूरत येथून निघालेले हे आमदार सकाळी सातच्या सुमारास गुवाहाटी येथे पोहोचले. त्यांना नेण्यासाठी आसाम स्टेट ट्रान्सपोर्टच्या बस सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. त्यामधून ते गुवाहाटीमधील एका हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत.